तिरुपती लाडू प्रसाद तूप भेसळ प्रकरणी 'सुकृती फूड्स'च्या प्रवर्तकाला ईडीकडून अटक!
गायीचे शुद्ध तूप म्हणून विकले पामतेल अन् घातक केमिकल्स
अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
हैदराबाद दि. २० (प्रतिनिधी) :- जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (टीटीडी) लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपातील कथित भेसळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत तपास करत असलेल्या 'ईडी'ने 'सुकृती फूड्स'चे प्रवर्तक कैलास चंद मंगला यांना अटक केली आहे. तिरुपती देवस्थानला अस्सल गायीचे शुद्ध तूप म्हणून पुरवण्यात आलेले तूप प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाचे तसेच रिफाइंड पामतेल आणि विविध घातक रसायनांचे मिश्रण करून तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणेने ठेवला आहे.
ईडीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, टीटीडी तूप भेसळ प्रकरणाच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद कार्यालयाने कैलास चंद मंगला यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना विशाखापट्टणम येथील मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मंगला यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासादरम्यान लाडू प्रसादाच्या पावित्र्याशी खेळ करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
तपास यंत्रणेने उघड केलेल्या माहितीनुसार, तिरुपती लाडू प्रसादासाठी पुरवले गेलेले कथित भेसळयुक्त तूप तयार करण्यासाठी रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल आणि पामोलिनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. केवळ तेलाचा वापर न करता, या मिश्रणाला तुपासारखा रंग, वास आणि पोत देण्यासाठी एमजी-९०, मोनोग्लिसराइड्स, मायव्हेसेट सॉफ्ट ४०० आणि ॲसिटिक ॲसिड एस्टर यांसारख्या घातक रसायनांची भेसळ करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे हे घातक रासायनिक मिश्रण 'अगमार्क स्पेशल ग्रेड काऊ घी' (गायीचे शुद्ध तूप) असल्याचे भासवून देवस्थानला पुरवण्यात आले होते.
ईडीच्या प्राथमिक दाव्यानुसार, २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत तिरुमला तिरुपती देवस्थानमला करण्यात आलेला तुपाचा बनावट आणि फसवणुकीचा पुरवठा तब्बल २३० कोटी रुपयांच्या घरात होता. यामध्ये कैलास चंद मंगला यांनी स्वतःच्या कारखान्यात सुमारे ९६ कोटी रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप तयार केले होते. मंगला हे या संपूर्ण रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांपैकी एक असून, त्यांनी भेसळ करण्यासाठी लागणारे घटक मिळवून देण्यासोबतच स्वतःच्या युनिटमध्ये भेसळयुक्त तूप बनवून ते पुढे पुरवण्याचे जाळे विणले होते.
या बेकायदेशीर व्यापारासाठी कैलास चंद मंगला यांनी 'श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज', 'मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स' आणि 'ए. आर. डेअरी फूड्स' यांसारख्या विविध बनावट कंपन्यांचा (फ्रंट एंटिटीज) वापर केला. भेसळयुक्त घटकांचा वापर तपास यंत्रणांच्या नजरेतून लपवण्यासाठी आणि कागदोपत्री अस्सल गायीच्या तुपाचेच कायदेशीर उत्पादन व पुरवठा सुरू असल्याचे दाखवण्यासाठी तूप तसेच रिफाइंड पामतेलाच्या खरेदी-विक्रीशी संबंधित बनावट रेकॉर्ड तयार करण्यात आले होते. यापूर्वीही याच पद्धतीच्या आरोपांखाली यंत्रणेने 'भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क'चे संचालक विपिन जैन यांना अटक केली होती. सध्या मंगला न्यायालयीन कोठडीत असून, भाविकांच्या श्रद्धेशी प्रतारणा करणाऱ्या या आर्थिक आणि अन्न भेसळ गैरव्यवहाराची पाळेमुळे कुठवर पसरली आहेत, याचा सखोल तपास ईडीकडून सुरू आहे.

Comments
Post a Comment