मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

नागोठणे बाजारपेठेत प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री

बालाजी किराणा दुकानावर कारवाई; एकाला अटक


​रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर कडक बंदी घातलेली असतानाही, नागोठणे शहरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागोठणे बाजारपेठ येथील बालाजी किराणा दुकानामध्ये बेकायदेशीररीत्या साठा करून गुटख्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर नागोठणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

​नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोमल बिल्डींग, रूम नंबर २, कोळीवाडा, नागोठणे (ता. रोहा) येथील रहिवासी असलेल्या आरोपीने आपल्या ताब्यातील बालाजी किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवला होता. महाराष्ट्र शासन राजपत्रातील अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या पदार्थांची विक्री, साठा व वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही शासकीय आदेश व नियमांचे उल्लंघन करून हा अपायकारक माल विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या तपासणीत उघडकीस आले. हा प्रतिबंधित साठा त्याने आरोपी क्रमांक दोन याच्याकडून खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.

​या प्रकरणी नागोठणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित मुख्य आरोपीला २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३:५२ वाजता ताब्यात घेऊन अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर नशिल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या संपूर्ण प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २००/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६(२), २६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा हे करत असून, या गुटखा तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog