रायगड जिल्हा पोलीस दलातील २७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' पदाचा बहुमान
२७ खाकी रक्षकांचा सन्मान, ३० वर्षांच्या सेवेची पोचपावती
रायगड, दि. १० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर दीर्घकाळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या २७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना (एएसआय) अखेर 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' (Grade PSI) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र अंमलदारांना २७ ऑक्टोबर २०२६ पासून हे संबोधन लागू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस नाईक हे संवर्ग रद्द करून त्यातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गात वर्ग करण्याचे आदेश जारी केले होते. या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक स्तरावर गठित सुकाणू समितीच्या निकषांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली. पोलीस सेवेत ३० वर्षे पूर्ण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान ३ वर्षे सेवा आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे वेतनमान (Level: S-१४, ३८,६०० पेक्षा जास्त) या विहित अटी पूर्ण करणाऱ्या अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संबोधण्याची शिफारस करण्यात आली होती.
या निकषांची पूर्तता करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २७ अंमलदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालय येथील विश्वनाथ देवजी पाटील व शशिकांत वसंत पाटील, कोलाड येथील काशिनाथ शांताराम नागे, म्हसळा येथील राजेश हिरामण पाटील, पोलादपूर येथील भाऊराव गणपत शिंगणकर, सुरक्षा शाखेतील सुधाकर गंगाराम पाटील, पाली येथील सुनिल महादेव गायकवाड, अलिबाग येथील परेश रामचंद्र ठाकुर, खालापूर येथील प्रमोद रघुनाथ पाटील, अलिबाग पोलीस ठाण्याचे ललित वसंत कडू, नागोठणे येथील दिनेश पांडुरंग थळे, चंद्रकांत वासुदेव पाटील, भानुदास अनंत म्हात्रे, राजेश अनंत म्हात्रे व नितेश शंकर कवळे, रेवदंडा येथील महेंद्र नरहर खोत व मिलिंद जनार्दन सुर्वे, पोयनाड येथील संतोष यशवंत पाटील, जिल्हा वाहतूक शाखेतील किशोर गजानन गुरव व गणेश सोपान तांडेल, वडखळ येथील सूर्यकांत रामभाऊ गावंड व भाग्यवान बाळाराम कांबळे, खोपोली येथील संजय नाया सताणे, पेण येथील विलास रघुनाथ म्हात्रे, सायबर पोलीस ठाण्याचे अजय दत्ताराम मोहिते, बांगलादेशी पथकातील संजय एकनाथ ठाकूर आणि खालापूर उपविभागीय कार्यालयातील सचिन शांताराम पाटील यांचा समावेश आहे.
सदर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक हे संबोधन वैयक्तिक स्वरूपाचे असून, नियमित पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळेपर्यंत हे अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाचीच कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. तसेच संबंधितांविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी, न्यायालयीन खटला अथवा निलंबनाची कारवाई प्रलंबित नसल्याची खात्री करण्याचे निर्देश प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या निवडीनंतर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सर्व पदोन्नत अंमलदारांचे अभिनंदन केले असून, जिल्हा पोलीस दलात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Post a Comment