रोहा तालुक्यातील वणी गावात शाळेमागे आढळलेल्या ८ फुटी अजगराला जीवदान
शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला
बेणसे-रायगड, दि. १२ (चंद्रकांत अडसुळे) :- रोहा तालुक्यातील वणी गावातील शाळेच्या पाठीमागे बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर २०२६) सकाळी सुमारे आठ फूट लांबीचा आणि पंधरा किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुदैवाने घटनेच्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी शाळेत नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, शाळेच्या अगदी जवळच हा भलामोठा अजगर दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक दीपक आवाद, किशोर मांडळुस्कर आणि दीपेंद्र आवाद यांनी प्रसंगावधान राखत सकाळी दहा वाजता तात्काळ सर्पमित्र तथा कामगार नेते किशोर शिर्के यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून याबाबत कळवले.
घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र किशोर शिर्के यांनी तातडीने वणी गावात धाव घेतली. शाळेच्या पाठीमागील दाट झुडपांमध्ये लपलेल्या या अजगराचा त्यांनी अत्यंत कौशल्याने शोध घेतला. स्थानिकांच्या मदतीने आणि कोणतीही इजा होऊ न देता त्यांनी या आठ फुटी अजगराला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही मोहीम यशस्वीरीत्या फत्ते झाली. यावेळी अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती, मात्र शिर्के यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत वन्यजीवांचे महत्त्व समजावून सांगितले.
सदर अजगर पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर सर्पमित्र किशोर शिर्के यांनी त्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन जवळच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच घनदाट जंगलात नेऊन मुक्त केले. शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांचा वावर नसला तरी, या महाकाय अजगराला वेळेत पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडल्यामुळे संभाव्य धोका पूर्णपणे टळला आहे. या कामगिरीबद्दल वणी ग्रामस्थांकडून सर्पमित्र किशोर शिर्के आणि त्यांना माहिती देणाऱ्या तरुणांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सध्या निसर्गाचा ऱ्हास होत असल्यामुळे वन्यजीव संरक्षण महत्त्वाचे आहे. म्हणूनच सर्पमित्र किशोर शिर्के यांनी 'वन्यजीवांचे रक्षण हीच निसर्गाप्रती खरी जबाबदारी' हा संदेश या घटनेतून अधोरेखित केला आहे.

Comments
Post a Comment