मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

वारकऱ्यांच्या नावाला काळीमा फासणारा 'तो' महाराज अद्यापही मोकाट; पीडित महिलेचा न्यायासाठी आक्रोश!

आरोपी सापडत नसल्यास तपास C.I.D. कडे देण्याची आदिवासी संघटनांची मागणी

 सुकेळीतील ॲट्रॉसिटी प्रकरण 


​रोहा-रायगड, दि. २४ (विशेष प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सुकेळी येथे लहान मुलांच्या अगदी किरकोळ वादातून एका आदिवासी समाजातील महिलेला बेदम मारहाण करत भररस्त्यात जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित वारकरी महाराजासह चौघांवर नागोठणे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अद्याप मोकाटच आहे. गळ्यात तुळशीची माळ घालून नित्यनेमाने वारी आणि हरिपाठ करणाऱ्या एका व्यक्तीने अशा प्रकारे असहाय्य महिलेवर हिंसक हल्ला करून वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेला आणि नावाला काळीमा फासला आहे. एकीकडे आरोपी खुलेआम फिरत असल्याने पीडित महिला न्यायासाठी आक्रोश करत असताना, दुसरीकडे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपी जर नागोठणे पोलिसांना सापडत नसतील तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवावा, अशी अत्यंत आक्रमक मागणी आता विविध आदिवासी संघटनांनी लावून धरली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुकेळी येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय फिर्यादी महिला ही अत्यंत कष्टाने आपल्या संसाराचा गाडा चालवते. कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला मारहाण झाल्याच्या कारणावरून त्या संबंधित मुलीकडे विचारणा करण्यास गेल्या असता, स्वतःला 'महाराज' म्हणून वावरणारा वारकरी जितेंद्र चंद्रकांत धामणसे याने वादात उडी घेत महिलेला दमदाटी सुरू केली. 'आमच्या बायकांच्या भांडणात पडू नका' असे फिर्यादीने म्हटल्याचा राग मनात धरून, तथाकथित महाराज जितेंद्र धामणसे याने घरातून बाहेर येत फिर्यादी महिलेची मान पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा मुलगा जिवेश, पत्नी सविता आणि आई चंद्रभागा यांनीही महिलेवर धावून जात मारहाण सुरू केली. प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी वाद सोडवल्यानंतरही आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन 'आदिवासी कातकरी आम्हाला शिकवायला आली, हिला मारायला नव्हे तर जाळायला पाहिजे' अशा अत्यंत विकृत शब्दांत सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती.

​या प्रकरणात नागोठणे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या घटनेचे सबळ पुरावे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे उपलब्ध असूनही आजतागायत मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. आरोपी मोकाट असल्याने पीडित महिला आणि तिचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली वावरत असून न्यायासाठी सतत आक्रोश करत आहे.

​या प्रकारामुळे आदिवासी समाजात प्रचंड असंतोषाची लाट उसळली असून विविध आदिवासी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, सुकेळीतील या गुन्ह्यात वारकऱ्यांचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या तथाकथित महाराजाचा खरा हिंसक चेहरा उघडा पडला आहे. इतके गंभीर गुन्हे दाखल असताना आणि पीडितेचा आक्रोश सुरू असताना पण आरोपी अद्यापही मोकाट फिरत असेल, तर त्या हिंसक वृत्तीच्या आरोपीकडून अन्य प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही! त्यामुळे या प्रकरणाचा तपास तात्काळ सीआयडीकडे (CID) वर्ग करण्यात यावा, जेणेकरून पीडित महिलेला न्याय मिळून या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या जातील. आरोपींना लवकरात लवकर गजाआड न केल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशाराही आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog