आंबेवाडी आदिवासीवाडीतून विवाहीत महिला बेपत्ता
अज्ञात इसमाविरोधात कोलाड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
रोहा-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथून एक महिला अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या घरातून कोणालाही काही एक न सांगता निघून गेलेल्या या महिलेचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने, अखेर अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील इंदापूर जवळील रातवड आदिवासीवाडी येथील फिर्यादी यांच्या बहिणीचे लग्न आंबेवाडी आदिवासीवाडी, तालुका रोहा येथे झाले असून ती आपल्या सासरी पती व सासरच्या लोकांसोबत राहत होती. दरम्यान, संबंधित महिला आपल्या राहत्या घरातून कोणासही कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक निघून गेली. बरीच वाट पाहूनही ती परत न आल्याने तिच्या सासरच्या तसेच माहेरच्या मंडळींनी आसपासच्या संपूर्ण परिसरात, ओळखीच्या लोकांकडे, नातेवाईक आणि मित्रपरिवारात तिचा कसून शोध घेतला. मात्र, सर्व ठिकाणी शोध घेऊनही तिचा कुठेही थांगपत्ता लागू शकला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने तिला तिच्या पतीच्या कायदेशीर रखवालीतून कसलेतरी आमिष दाखवून अथवा फुस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्याने, फिर्यादी यांनी कोलाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे आदिवासीवाडी परिसरात खळबळ उडाली असून संबंधित महिलेचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार बांद्रे या करत आहेत.

Comments
Post a Comment