मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रायगड एलसीबीची धडक कारवाई!

तिन्ही राज्यांत ६८ गुन्हे नोंद असलेला आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार जेरबंद

पोलिसांवर गाडी घालणाऱ्या साथीदाराच्याही आवळल्या मुसक्या!


​रोहा-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडलेली घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आणण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगाराला शिताफीने जेरबंद केले असून, त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, आर्म्स ॲक्ट, कर्नाटक एक्साईज ॲक्ट तसेच खुनाचा प्रयत्न यांसारखे तब्बल ६८ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच कारवाईदरम्यान तपास पथकाच्या वाहनाला धडक देऊन पोलिसांच्या अंगावर थेट गाडी घालणाऱ्या त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही पुणे परिसरातून थरारक पाठलागानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
​नागोठणे पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. १८७/२०२६, BNS कलम ३३१(३), ३३१(४), ३०५) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत समांतर तपास सुरू करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस अंमलदार विनोद पाटील, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, शामराव कराडे, अक्षय पाटील व तुषार घरत यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांच्या माध्यमातून कौशल्याने तपास चक्रे फिरवली. या अचूक माहितीच्या आधारे पथकाने मुख्य आरोपी लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) याला सापळा रचून ताब्यात घेतले व त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास नागोठणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
​तपासादरम्यान समोर आलेली आरोपी लोकेश सुतार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अत्यंत धक्कादायक असून तो सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाहिजे असलेला वॉन्टेड आरोपी होता. त्याच्यावर दाखल असलेल्या ६८ गुन्ह्यांचा विस्तार तीन राज्यांत पसरलेला आहे. यामध्ये कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील जामखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात ६ गुन्हे व मुधोळ पोलीस ठाण्यात १ गुन्हा, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी पोलीस ठाण्यात २ गुन्हे व अथणी पोलीस ठाण्यात ३ गुन्हे, विजयपुरा जिल्ह्यातील आदर्शनगर पोलीस ठाण्यात १ गुन्हा व झालकी पोलीस ठाण्यात १ गुन्हा तसेच कुडची पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. तसेच गोवा राज्यातील ओल्ड गोवा पोलीस ठाण्यात १ गुन्हा नोंद आहे.
​महाराष्ट्रातही त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला असून, सांगली जिल्ह्यातील सांगली सिटी पोलीस ठाण्यात ३ गुन्हे, विश्रामबाग पोलीस ठाण्यात १, विटा पोलीस ठाण्यात ३, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व आर्म्स ॲक्टसह ३ गुन्हे, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टसह ९ गुन्हे, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात १ आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी, शिवाजीनगर, शिरोळ आणि हातकणंगले पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा नोंद आहे. पुणे परिसरातील बिबेवाडी पोलीस ठाण्यात २ गुन्हे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात २ गुन्हे, शिक्रापूर पोलीस ठाण्यात १ आणि बारामती पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे.
​याशिवाय मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यात २ गुन्हे व ओशिवरा पोलीस ठाण्यात १ गुन्हा, नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्यात १ गुन्हा, रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाण्यात १ गुन्हा, सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस ठाण्यात १ व वाई पोलीस ठाण्यात २ गुन्हे, रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे पोलीस ठाण्यात २, चिपळूण पोलीस ठाण्यात १, खेड पोलीस ठाण्यात १, लांजा पोलीस ठाण्यात १ व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात १ गुन्हा नोंद आहे. तसेच नागपूर शहरातील बेलतारोडी पोलीस ठाण्यात १ गुन्हा, सोलापूर शहरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात १ गुन्हा, धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे २ गुन्हे, अकोला येथील ओल्ड सिटी पोलीस ठाण्यात १ गुन्हा आणि उपनगर पोलीस ठाण्यात १ गुन्हा अशा एकूण ६८ गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
​दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सुखदेव हनुमंत नाईक (वय २६ वर्षे, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली) याने तपास पथकाची चाहूल लागताच आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या थार वाहनाने पोलिसांच्या वाहनास जोरात धडक देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याने पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील नाकाबंदीदरम्यान शासकीय वाहनांचे मोठे नुकसान केले. एवढेच नव्हे, तर नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले पोलीस अंमलदार निरोझ रझाक शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले. या अत्यंत थरारक घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ वेगाने सूत्रे हलवून आरोपी सुखदेव नाईक याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात BNS कलम १०९ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची थार गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. रायगड एलसीबीच्या या धडक कामगिरीमुळे आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला असून सर्व स्तरांतून पोलिसांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog