मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले!

पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

 रायगड पोलिसांची धडक कारवाई 


रोहा-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- भारत देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध रायगड जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेत अत्यंत प्रभावी आणि उल्लेखनीय कारवाई केली आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत रायगड पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यातील वडखळ, पेण, रसायनी, अलिबाग आणि दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून एकूण १२ बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावत त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, आवश्यक त्या न्यायालयीन व प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत काही बांगलादेशी नागरिकांवर सीमापार कारवाई करण्यासाठी त्यांना होल्डिंग सेंटर पोलीस मुख्यालय रायगड येथे ठेवण्यात आले, तर काहींना कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुन्हा मूळ देश असलेल्या बांगलादेशात रवाना करण्यात आले आहे. तसेच परदेशी नागरिक पोर्टलवर या नागरिकांची बायोमेट्रिक माहिती अचूकपणे नोंदवून ती अद्ययावत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि तांत्रिक कामही या पथकाने चोख पार पाडले.

​अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या मोहिमेत विशेष पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कर्तव्यनिष्ठा, सतर्कता आणि कार्यतत्परता दाखवत उत्कृष्ट कामगिरी बजावली. या प्रशंसनीय कामगिरीची दखल घेत रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या हस्ते या मोहिमेत सहभागी असलेल्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय धुपकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस हवालदार कल्पेश टेमकर, महिला पोलीस हवालदार रसिका सुतार, पोलीस हवालदार मितेश म्हात्रे आणि पोलीस शिपाई श्रेयस म्हात्रे या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुखांकडून झालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण पोलीस दलात पथकाचे कौतुक होत असून, अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्यांवर वचक निर्माण करणाऱ्या रायगड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog