मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सुकेळी ॲट्रॉसिटी प्रकरण : अटकेच्या भीतीने 'त्या' तथाकथित महाराजासह चौघांची न्यायालयाकडे धाव

माणगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज


​कोलाड-रायगड (भिवा पवार) :- रोहा तालुक्यातील सुकेळी येथे लहान मुलांच्या क्षुल्लक वादातून एका आदिवासी समाजातील महिलेला बेदम मारहाण करून भररस्त्यात जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित वारकरी महाराजासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे धाबे दणाणले आहेत. या गंभीर गुन्ह्यात नागोठणे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि विविध संघटनांनी अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, अटकेच्या भीतीने आरोपींनी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. या जामीन अर्जावर मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाची सुनावणी होणार असून, या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी फिर्यादी महिलेला रीतसर लेखी पत्र दिले आहे.

​सुकेळी येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय फिर्यादी महिला कामावरून घरी परतल्यानंतर, त्यांच्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला खेळताना मारहाण झाल्याच्या कारणावरून त्या विचारणा करण्यास गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आणि स्वतःला 'महाराज' म्हणून घेणाऱ्या जितेंद्र चंद्रकांत धामणसे याने वादात मध्यस्थी केली. 'आमच्या बायकांच्या वादात पडू नका' असे फिर्यादीने म्हटल्याचा राग मनात धरून, नित्यनेमाने वारी आणि हरिपाठ करणाऱ्या जितेंद्र धामणसे याने घरातून बाहेर येत फिर्यादी महिलेची मान पकडून हाताच्या बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्याचा मुलगा जिवेश, पत्नी सविता आणि आई चंद्रभागा यांनीही फिर्यादी महिलेवर धावून जात मारहाण केली. ग्रामस्थांनी वाद सोडवल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन 'आदिवासी कातकरी आम्हाला शिकवायला आली, हिला मारायला नव्हे तर जाळायला पाहिजे' अशा अत्यंत विकृत शब्दांत सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

​या प्रकरणात नागोठणे पोलिसांनी गुन्हा नोंदवही क्रमांक १८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) सह विविध सामाजिक संघटनांनी थेट जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सुरू केल्याने आरोपींवर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली होती.

​पोलिसांकडून केव्हाही बेड्या ठोकल्या जाऊ शकतात या भीतीने आरोपी जितेंद्र चंद्रकांत धामणसे, जिवेश जितेंद्र धामणसे, सविता जितेंद्र धामणसे आणि चंद्रभागा चंद्रकांत धामणसे (सर्व रा. सुकेळी, ता. रोहा) यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज क्रमांक १५३/२०२६ अन्वये धाव घेतली आहे. या अर्जावर न्यायालय काय भूमिका घेते आणि आरोपींचा जामीन फेटाळून त्यांना गजाआड करण्याचे आदेश देते का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग यांच्या कार्यालयामार्फत फिर्यादी महिलेला पत्र पाठवून जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog