मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रोह्यात मध्यरात्री वनविभागाची मोठी कारवाई; १६ टायरचा टाटा ट्रक ताब्यात

या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार हा दापोलीचा? त्याच्यावर कारवाई होते की त्याला यातून वाचवले जातेय? याकडे सर्वांचे लक्ष


रोहा-रायगड, दि. ३ (प्रतिनिधी) :- रोहा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत कोलाड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास वनविभागाने मोठी कारवाई करत १६ टायरचा मोठा टाटा ट्रक ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ट्रकमध्ये खैरापासून प्रक्रिया करून तयार केलेला द्रव पदार्थ असल्याची माहिती मिळत असून, संबंधित वाहन सध्या चणेरा येथील वनविभागाच्या ताब्यातील डेपोमध्ये ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळे खैराच्या वनउपजापासून तयार होणाऱ्या कात तसेच त्याच्या वाहतुकीशी संबंधित व्यवहारांबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड परिसरात वनविभागाच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास संशयित वाहनावर कारवाई केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ आढळून आल्याचे समजते. हा द्रव पदार्थ नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे, त्याचे प्रमाण किती आहे, त्याची निर्मिती कुठे झाली आणि तो कुठे वाहून नेला जात होता, याबाबत अद्याप वनविभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, सदर द्रव पदार्थ हा खैरापासून तयार करण्यात आलेला असल्याची चर्चा आहे. खैरापासून कात तयार करण्याच्या प्रक्रियेशी या पदार्थाचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकारच्या काताचा वापर पानमसाला अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या निर्मितीमध्ये होत असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, जप्त करण्यात आलेला पदार्थ नेमका कोणता आहे आणि त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, हे अधिकृत तपासणी व नमुना परीक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे.

कारवाई करण्यात आलेला ट्रक हा १६ टायरचा असून तो टाटा कंपनीचा असल्याची माहिती आहे. वाहनाचा नोंदणी क्रमांक उत्तर प्रदेश मालिकेतील असल्याचे समजते. वाहन क्रमांक UP77 AT 5450 असल्याची प्राथमिक माहिती असून वाहनामध्ये असलेल्या द्रव पदार्थाचे प्रमाण मोठे असल्याचे सांगितले जात असून, वाहनासह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याची चर्चा आहे. काही सूत्रांकडून हा आकडा सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात असले तरी या किमतीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या कारवाईनंतर तपासाचे धागेदोरे दापोलीतील कात उद्योगाशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. विशेषतः दापोलीतील कात उद्योगाशी संबंधित एका प्रमुख व्यावसायिकाचे नाव या प्रकरणाच्या संदर्भात चर्चेत येत असून, जप्त करण्यात आलेल्या मालाचा आणि संबंधित व्यक्तीचा प्रत्यक्ष संबंध आहे का, याचा तपास वनविभाग करणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, सध्याच्या कारवाईतील वाहन किंवा मालाशी संबंधित व्यक्तीचा थेट सहभाग असल्याचे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.


या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार हा दापोलीचा?


या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार हा दापोलीचा? त्याच्यावर कारवाई होते की त्याला यातून वाचवले जातेय? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेय. जप्त करण्यात आलेला माल नेमका कुठून आला, त्याची मालकी कोणाची आहे, वाहतुकीसाठी कोणती कागदपत्रे वापरण्यात आली होती आणि सदर मालाचा अंतिम ठावठिकाणा कोणता होता, याचा तपास झाल्यानंतरच या चर्चेला कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणाबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “पंचनामा सुरू आहे. प्रकरणात जे काही दाखल केले आहे, त्याबाबत सोमवारी माहिती देण्यात येईल,” अशी माहिती रोहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सदर वाहनावर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, वनगुन्हा अहवाल अथवा अन्य कोणत्या स्वरूपाची नोंद करण्यात आली आहे, तसेच जप्त मालाचे अधिकृत स्वरूप काय आहे, याचा तपशील सोमवारीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणात वनविभागाकडून पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याने जप्त मालाचे प्रमाण, त्याचे मूल्यांकन, वाहनमालकाची अधिकृत माहिती, मालाच्या वाहतुकीसंबंधी कागदपत्रे आणि प्रकरणात दाखल करण्यात आलेली कायदेशीर नोंद याबाबत सध्या अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे खैराची अवैध वाहतूक, कात निर्मितीशी संबंध किंवा कोणत्याही व्यक्तीचा सहभाग याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी वनविभागाच्या तपासाचा अधिकृत अहवाल समोर येणे आवश्यक आहे.

मध्यरात्री झालेल्या या कारवाईत मोठ्या क्षमतेचा ट्रक ताब्यात घेण्यात आल्याने आणि त्यामध्ये खैराशी संबंधित असल्याचा संशय असलेला मोठ्या प्रमाणातील द्रव पदार्थ असल्याची माहिती समोर आल्याने या कारवाईकडे आता संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे. सोमवारी वनविभागाकडून या प्रकरणातील अधिकृत तपशील जाहीर झाल्यानंतरच कारवाईचे खरे स्वरूप, त्यातील आरोपी किंवा संबंधित व्यक्ती आणि कारवाईची व्याप्ती स्पष्ट होणार आहे.

Comments

Popular posts from this blog