मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रत्नागिरी पोलिसांच्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई!

मुरुगवाडा परिसरातून ब्राऊन हेरॉईनसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त


रत्नागिरी, दि. २३ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याला आळा घालण्यासाठी आणि व्यसनमुक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरुगवाडा पांढरा समुद्र परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत एका संशयिताकडून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेले ब्राऊन हेरॉईन जप्त केले आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह एका दुचाकी वाहनाचा समावेश असून पोलिसांनी एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे मुरुगवाडा पांढरा समुद्र परिसरामध्ये गस्त घालत होते. पेट्रोलिंग सुरू असताना तेथे एका इसमाची संशयास्पद हालचाल पोलिसांच्या निदर्शनास आली. संशय बळावल्याने पथकातील पोलिसांनी तात्काळ त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस सुरू केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सत्य सांगितले. पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवलेला ब्राऊन हेरॉईन हा घातक अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत सदर इसमाकडील ब्राऊन हेरॉईन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित इसमाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

​ही महत्त्वपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अरांक्षा यादव (भा.पो.से.), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत भविष्यातही अशीच धडक मोहीम सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog