मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रायगड पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या तीन पर्यटकांना वाचवले


​दिवेआगर-रायगड, दि. ५ (प्रतिनिधी) :- ‘सदैव सेवेसी तत्पर’ हे आपले ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सार्थ ठरवत रायगड पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि दक्षतेमुळे दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या तीन पर्यटकांना नवजीवन मिळाले आहे. रायगड जिल्ह्यातील नामांकित पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तीन पर्यटकांनी आज समुद्रात उतरून पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील विसर्जन पॉईंटजवळ समुद्राच्या लाटा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे तिन्ही पर्यटक अचानक खोल पाण्यात खेचले गेले आणि समुद्रात बुडू लागले.

​पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने हे पर्यटक गटांगळ्या खाऊ लागले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. किनाऱ्यावर तैनात असलेल्या पोलीस यंत्रणेच्या कडेकोट बंदोबस्तात पोर्ट केबिन येथे कर्तव्यावर असलेले होमगार्ड रेवाळे यांनी ही बाब तात्काळ हेरली. रायगड पोलिसांच्या सतर्क व दक्ष पहारूपाने क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली जेटस्कीच्या सहाय्याने समुद्रात थरारक बचाव मोहीम राबवण्यात आली.

​कर्तव्यावर असलेल्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून अथक प्रयत्नांनंतर तिन्ही पर्यटकांना लाटांच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढले. रायगड पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे समुद्रकिनाऱ्यावर घडणारी मोठी जीवितहानी टळली असून पर्यटकांच्या नातेवाईकांनी व उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. समुद्रातून बाहेर काढल्यानंतर तिन्ही पर्यटकांची प्रकृती स्थिर असून अधिक तपासणी व उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​रायगड पोलिसांनी दाखवलेली ही कर्तव्यनिष्ठा, सतर्कता आणि संकटसमयी दाखवलेली तत्परता यामुळे पोलिसांचे सर्वत्र मोठे कौतुक होत असून ‘रायगड पोलीस – सदैव सेवेसी तत्पर’ असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा नागरिकांना आला आहे. दरम्यान, समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद लुटताना पर्यटकांनी सुरक्षिततेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, पाण्याचा अंदाज नसताना समुद्रात पोहण्याचे धाडस करू नये आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन रायगड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog