पुई गावात मोबाईल टॉवरच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोलाड-रायगड, दि. १२ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड नजीकच्या पुई गावच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरचे मौल्यवान साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुई गावामध्ये गजानन कृष्णा कोंडे यांच्या मालकीची गट क्रमांक १४३/१ ही जागा आहे. या जागेवर जी.टी.एल. इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची 'नावगोवे' नावाची मोबाईल टॉवर साईट कार्यान्वित आहे. सदर साईटवर जी.टी.एल. इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या मालकीचे तसेच रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवरकरिता अत्यंत आवश्यक असलेले आर्टिकल क्रमांक ०१ ते ६७ हे तांत्रिक साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोणाचीही नजर नसताना अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अथवा कंपनीच्या प्रतिनिधींची कोणतीही संमती न घेता हे सर्व साहित्य चोरून नेले. साहित्याची चोरी झाल्याचे निदर्शनास येताच कंपनीच्या वतीने कोलाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे कोलाड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. १६०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निळेकर करत असून, चोरी गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे.

Comments
Post a Comment