पंतप्रधान सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘RAIDS’ ॲपचा देशात तृतीय क्रमांक
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेची राष्ट्रीय स्तरावर दखल
रत्नागिरी, दि. ४ (प्रतिनिधी) :- गुन्हे तपास प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘रेड्स’ (RAIDS) ॲप्लिकेशनला प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ राष्ट्रीय स्पर्धेत देशात तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे ॲप साकारण्यात आले असून, त्यांच्या या तंत्रज्ञानस्नेही उपक्रमाची थेट राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासह संपूर्ण पोलीस यंत्रणेत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला आणि तंत्रज्ञानाधिष्ठित आधुनिक स्मार्ट पोलीसिंगच्या व्हिजनला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने हे ॲप्लिकेशन अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना पोलीस दलानेही तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम व गतिमान व्हावे, या उद्देशाने अधीक्षक नितीन बगाटे यांनी ‘RAIDS’ या एआय आधारित प्रणालीची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली. या ॲपच्या माध्यमातून गुन्हे तपास, डेटा विश्लेषण आणि संशयितांचा शोध घेण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान व अचूक होण्यास मोठी मदत होत आहे.
राष्ट्रीय स्तरावर देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांमधून या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक अचूकता, उपयुक्तता आणि तपासातील कार्यक्षमता या सर्व निकषांवर रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘RAIDS’ ॲपने आपली वेगळी छाप पाडत तिसरा क्रमांक पटकावला. जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या एका तांत्रिक उपक्रमाने देशपातळीवर तृतीय क्रमांक मिळवणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच रत्नागिरी पोलिसांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. या राष्ट्रीय सन्मानानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशासकीय वर्गाकडून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, या यशामुळे तंत्रज्ञानाधारित पोलीस तपासाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment