मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवाशाचा चालकाला पिस्तुलाचा धाक

डोक्याला पिस्तूल रोखून लुटले चार हजार रुपये


​खालापूर-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्सप्रेसवे) प्रवासादरम्यान चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडप गावच्या शिवारात अज्ञात प्रवाशाने कारचालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याच्याकडील रोख रक्कम जबरीने हिसकावून पोबारा केला. या थरारक प्रकारामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कळंबोली, सेक्टर २ ई मधील एलआयजी २ परिसरातील रहिवासी असलेल्या कारचालकाला एका कंपनीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरून अज्ञात आरोपीने संपर्क साधला होता. पुण्याहून सीबीडी बेलापूर येथे जाण्यासाठी आरोपीने ही कार भाड्याने घेतली होती. प्रवासादरम्यान कार मुंबईच्या दिशेने जात असताना, पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील खालापूर टोलनाका आणि पहिला बोगदा ओलांडल्यानंतर काही अंतरावर मुंबई लेनवर माडप गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खांब ओलांडून पुढे जाताच संबंधित प्रवाशाने चालकाला गाडी रस्त्याच्या कडेला थांबवण्यास सांगितले.
​गाडी कडेला थांबताच त्या अज्ञात प्रवाशाने आपल्या कमरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. त्याने थेट चालकाच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि चालकाच्या पॅन्टच्या खिशात असलेले चार हजार रुपये रोख जबरीने काढून घेतले. भररस्त्यात घडलेल्या या अचानक आणि भयानक प्रसंगामुळे चालक प्रचंड घाबरला. पैसे लुटल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.
​या गंभीर घटनेनंतर पीडित कारचालकाने खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२२/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(६), ३११ आणि ३५१(२) अन्वये जबरी चोरी आणि शस्त्राचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. द्रुतगती मार्गावर थेट पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार झाल्याने पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित ॲप्लिकेशनवरील आरोपीची माहिती व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा कसून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव करत आहेत.

Comments

Popular posts from this blog