रहिमतपूर पोलिसांची धडक कारवाई!
सुट्टीवर आलेल्या जवानाच्या घरातील चोरीचा २४ तासांत छडा!
२ लाखांची सोन्याची चेन हस्तगत
सातारा, दि. २ (प्रतिनिधी) :- बोरीव (ता. कोरेगाव) परिसरामध्ये सुट्टीवर आलेल्या एका आर्मी जवानाच्या घरात झालेल्या चोरीचा अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावण्यात रहिमतपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेली १६ ग्रॅम वजनाची आणि सुमारे २ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन शंभर टक्के हस्तगत केली असून, पोलिसांच्या या वेगवान आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
देशसेवेसाठी सीमेवर कार्यरत असलेला आर्मी जवान सुट्टीनिमित्त बोरीव येथील आपल्या घरी आला होता. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्याच्या घराला लक्ष्य करत घरातील मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. जवान सुट्टीवर असतानाच त्याच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गुप्त बातमीदारांच्या आधारे कौशल्याने तपास करत २४ तासांच्या आत संशयिताचा माग काढला आणि चोरीस गेलेली २ लाख रुपये किमतीची १६ ग्रॅम सोन्याची चेन जप्त केली. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अल्पावधीत केलेली १०० टक्के मुद्देमाल जप्ती यामुळे जवानासह परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
सदर यशस्वी कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक एम. एम. खान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयराम पवार, दीपक जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल बर्गे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, अमर भोसले, समाधान देशमुख आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्पिता गायकवाड यांनी अत्यंत महत्त्वाची व चोख भूमिका बजावली. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या पोलिसांच्या या जलद व धडक कामगिरीचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment