धगडवाडीत घरामागे भांडी घासणाऱ्या महिलेवर अज्ञात इसमाचा जीवघेणा हल्ला!
कोलाड परिसरातील परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक भयभीत
भाडेकरूंची कसून चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
कोलाड-रायगड, दि. १५ (भिवा पवार) :- रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मौजे धगडवाडी येथे एका महिलेवर अज्ञात इसमाने अचानक पाठीमागून येऊन काठी व धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे धगडवाडीसह संपूर्ण कोलाड परिसरात प्रचंड भीतीचे व खळबळजनक वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धगडवाडी येथील रहिवासी असलेल्या संबंधित महिला सकाळी आपल्या घराच्या मागील वरांड्यामध्ये नेहमीप्रमाणे भांडी घासण्याचे काम करत होत्या. त्यावेळी परिसरात सामसूम असल्याचा गैरफायदा घेत एका दबा धरून बसलेल्या अज्ञात इसमाने घराच्या मागील बाजूने वरांड्यात प्रवेश केला. महिला घरकामात व्यस्त असताना या इसमाने मागून येऊन थेट त्यांच्या उजव्या कानाच्या भागावर काठीने जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला सावरण्याआधीच हल्लेखोराने हातातील इतर कोणत्या तरी धारदार हत्याराने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाच्या मागील बाजूस तसेच हाताच्या बोटांवर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले व तो घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेबाबत कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. महाडिक करत आहेत.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोलाड परिसरामध्ये मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोलाड पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर, कोलाड मोहल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका मोठ्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांची वस्ती आहे. या ठिकाणी केवळ पुरुष मंडळी वास्तव्यास असून ते ५० ते ६० मोटारसायकलींवरून प्लास्टिकच्या वस्तू विकण्याच्या बहाण्याने संपूर्ण रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसभर फिरत असतात.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात संशयास्पदरीत्या फिरणारे हे परप्रांतीय नेमके कुठून आले आहेत, त्यांना भाड्याने जागा देणाऱ्या संबंधित इमारत मालकाकडे या सर्व लोकांचे ओळखपत्र, मूळ पत्त्याचा तपशील किंवा संपूर्ण बायोडाटा जमा आहे का, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या या शेकडो परप्रांतीयांची अधिकृत नोंद किंवा पडताळणी कोलाड पोलिसांकडे उपलब्ध आहे का, असा सवालही नागरिक विचारत आहेत. भविष्यात अशा घटकांकडून एखादा गंभीर गुन्हा घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विचारला जात असून कोणतीही अधिकृत माहिती न घेता त्यांना आसरा देणाऱ्या संबंधित इमारत मालकाचीही सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी आता कोलाड परिसरातून जोर धरू लागली आहे.

Comments
Post a Comment