खोपोलीत सोसायटीच्या पार्किंगमधून ॲक्टिव्हा स्कूटर चोरीला!
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
खोपोली-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारपेठ परिसरातून पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. खालापूर तालुक्यातील खोपोली बाजारपेठ येथे असलेल्या प्रेरणा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या तक्रारदाराने आपली ॲक्टिव्हा मोटार स्कूटर (क्रमांक एम.एच. ४६ टी. १९२३) ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे पार्क करून ठेवली होती.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने तक्रारदाराच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या हेतूने सदर ॲक्टिव्हा स्कूटर सोसायटीच्या आवारातून चोरून नेली. दुचाकी जागेवर नसल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सर्वत्र शोध घेतला, मात्र गाडीचा काहीही थांगपत्ता न लागल्याने अखेर त्यांनी याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारदाराच्या फिर्यादीवरून खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दबडे हे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अज्ञात आरोपीचा कसून शोध सुरू आहे.

Comments
Post a Comment