अपघातग्रस्तांसाठी धावून येणाऱ्या 'जीवनदूतांचा' अलिबागमध्ये गौरव
पालकमंत्री भरतशेठ गोगावलेंकडून बचाव पथकांना आधुनिक साधनसामग्रीसाठी निधीची ग्वाही
संकटसमयी धावून येणारे हातच खरे जीवनदूत - भरतशेठ गोगावले
अलिबाग-रायगड, दि. ८ (विशेष प्रतिनिधी) :- अपघाताच्या निर्णायक क्षणी मिळालेली अवघ्या काही मिनिटांची मदत केवळ एका व्यक्तीचा जीव वाचवत नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाचा आधार कायम राखते. त्यामुळे निस्वार्थ भावनेने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे नागरिक आणि बचाव पथके हीच खरी जीवनदूत आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी काढले. रायगड पोलीस दलाच्या वतीने आयोजित 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' अंतर्गत कुरुळ येथील आरसीएफ थळ सभागृहात पार पडलेल्या 'जीवनदूत सन्मान सोहळा २०२६' मध्ये ते बोलत होते.
या विशेष सोहळ्यात रायगड जिल्ह्यात कुठेही दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती अथवा संकट ओढवल्यास स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तातडीने मदतकार्य करणाऱ्या विविध बचाव पथकांचा, सामाजिक संस्थांचा तसेच संवेदनशील नागरिकांचा 'जीवनदूत पुरस्कार' देऊन सन्मानचिन्हासह गौरव करण्यात आला. संकटसमयी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या या जिगरबाज कार्यकर्त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांच्या या सेवेमुळे माणुसकीची साखळी अधिक मजबूत होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी त्यांनी जीवनदूत पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व बचाव पथके, सामाजिक संस्था आणि पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या. तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या बचाव पथकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांना अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक त्या निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची आणि संकटसमयी गरजूंना तातडीने मदत करण्याची सामूहिक शपथ घेतली. अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेवर उपचार मिळणे ही एका कुटुंबाला पुन्हा हसण्याची संधी मिळवून देण्यासारखे असून प्रत्येकाने जागरूक राहून रस्त्यावर जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचा संदेश या वेळी देण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यास रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, रिलायन्स उद्योग समूहाचे अनिल डांगी यांच्यासह हेल्प फाउंडेशन, शेलार मामा बचाव पथक, सह्याद्री रेस्क्यू पथकाचे सदस्य, अनेक जागरूक नागरिक आणि पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी ठरले असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Comments
Post a Comment