शासकीय नोकरीचे आमिष दाखवून तब्बल नऊ लाखांची फसवणूक
महाड शहर पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
महाड-रायगड, दि. ४ (प्रतिनिधी) :- शासकीय सेवेत नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार महाड येथे उघडकीस आला आहे. बनावट नियुक्ती आदेश दाखवून ही रक्कम उकळण्यात आली असून याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या फिर्यादी यांना आरोपी क्रमांक १ व २ यांनी संगनमत करून संपर्क साधला. फिर्यादी यांच्या मुलाला शासकीय सेवेत नोकरी मिळवून देतो, असा खोटा विश्वास आरोपींनी त्यांना दाखवला. या विश्वासाला बळकटी देण्यासाठी संशयित आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला खोट्या व बनावट स्वरूपाच्या शासकीय ऑर्डर (नियुक्ती आदेश) तयार करून दाखवल्या. मुलाला कायमस्वरूपी नोकरी लागणार या आशेपोटी फिर्यादी यांनी आरोपींवर पूर्ण विश्वास ठेवला.
नोकरीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात अशी एकूण ९ लाख रुपयांची भलीमोठी रक्कम उकळली. मात्र, पैसे घेऊन मोठा कालावधी लोटल्यानंतरही मुलाला कोणतीही नोकरी मिळाली नाही. तसेच वेळोवेळी विचारणा करूनही आरोपी टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी ते पैसे परत देण्यासही नकार दिला. आरोपींनी संगनमत करून केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी व त्यांच्या मुलाचा विश्वासघात करत बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नऊ लाखांची फसवणूक केली असल्याचे समोर आले.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादी यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १६१/२०२६ नुसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२०, ४०६, ४६५, ४६८ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते हे करीत आहेत. बनावट कागदपत्रे व नोकरीच्या आमिषाने नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अशा टोळ्यांपासून जनतेने सावध राहावे, असे आवाहनही या निमित्ताने पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment