'सुरक्षित नागरिक, सुरक्षित रायगड' ध्येयासह दहीहंडी उत्सवासाठी पोलीस दल सज्ज!
अडचणीच्या वेळी 'डायल ११२' वर संपर्काचे आवाहन
रायगड, दि. ५ (विशेष प्रतिनिधी) :- सद्भावना, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेला श्रीकृष्ण गोकुळाष्टमी व दहीहंडीचा सण रायगड जिल्ह्यासह राज्यभरात मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. या आनंददायी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाने अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जिल्हावासीयांना आणि भाविकांना गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
माखनचोरीची नटखट बाललीला, आपुलकी, निखळ प्रेम आणि सद्भावनेचा आदर्श देणारा हा सण केवळ आनंदापुरता मर्यादित नसून, समाजात बंधुभाव आणि एकात्मतेची भावना दृढ करणारा उत्सव आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांचा आनंद साजरा करत असतानाच प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात उत्तम संस्कार, सद्भावना आणि सामाजिक सुरक्षिततेची मूल्ये रुजवावीत, असा सकारात्मक संदेश रायगड पोलिसांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून व पोस्टद्वारे दिला आहे. हा उत्सव परंपरेची जपणूक करणारा, संस्कृतीचे संवर्धन करणारा आणि सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवणारा ठरावा, अशी भावनाही पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सण-उत्सवाच्या या चैतन्यमय वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रायगड पोलीस दल २४ तास सज्ज आहे. 'सुरक्षित नागरिक, सुरक्षित समाज, सुरक्षित पर्यावरण आणि सुरक्षित रायगड' या संकल्पनेला सर्वोच्च प्राधान्य देत, पोलिसांकडून जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी शिस्त बाळगावी, दहीहंडी पथकांनी सुरक्षिततेची सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत आणि सणाचा आनंद घेताना इतरांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
याशिवाय उत्सवादरम्यान कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रवासात अथवा उत्सवाच्या गर्दीत कधीही आणि कुठेही अडचणीत असाल किंवा तात्काळ मदतीची गरज भासल्यास नागरिकांनी त्वरित 'डायल ११२' या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव सेवेसी तत्पर असून नागरिकांनी शांततेत, एकोप्याने आणि सुरक्षितपणे गोकुळाष्टमी साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment