मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

गौरी-गणपती विसर्जनासाठी रायगड पोलिसांचा सहा दिवसांचा चोख बंदोबस्त

ढोल-ताशांचा गजर अन् बाप्पाच्या नामाचा जयघोष


​रायगड, दि. २० (प्रतिनिधी) :- लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर निर्माण झालेला भक्तिमय उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा अखंड चाललेला जयघोष अशा अत्यंत भारवलेल्या वातावरणात रायगड जिल्ह्यात गौरी-गणपती विसर्जन सोहळ्याची लगबग सुरू झाली होती. दीड, पाच आणि विशेषतः सात दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जनाच्या काळात जिल्ह्यात लाखो भाविक विसर्जन घाटांवर आणि समुद्रकिनाऱ्यांवर एकत्र येत असतात. या मंगलमय पर्वात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि भाविकांना सुरक्षित वातावरणात विसर्जन करता यावे, यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सलग सहा दिवसांचा विशेष आणि अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.




​रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण यांसारख्या प्रमुख सागरी किनारपट्टीच्या भागांसह पेण, महाड, रोहा, पनवेल परिसरातील नद्या, तलाव व विसर्जन घाटांवर भाविकांची अलोट गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी व्यापक रणनीती आखली. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली असून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या बंदोबस्तामध्ये स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, गृहरक्षक दल आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी समाजकंटकांवर करडी नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील महिला व पुरुष पोलीस अंमलदार गस्त घालताना दिसत होते, जेणेकरून महिलांची छेडछाड, चोऱ्या आणि अनुचित वर्तनाला वेळीच पायबंद घालता येईल.


​विसर्जन मिरवणुकांचे नियोजन सुरळीत पार पडावे यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे मार्ग वळवले असून अवजड वाहनांना ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर आणि प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून नियंत्रण कक्षातून संपूर्ण हालचालींवर २४ तास थेट नजर ठेवली जात आहे. त्याशिवाय संभाव्य गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्यानेही हवेतून निगराणी केली जात आहे. सागरी विसर्जन स्थळांवर समुद्राच्या भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जीवरक्षक पथके, स्पीड बोटी आणि अग्निशामक दलाची पथके सज्ज ठेवण्यात आली असून, खोल पाण्यात न जाण्याबाबत भाविकांना वेळोवेळी ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जात आहेत.



​उत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच सुरक्षिततेचे भान राखणे तितकेच महत्त्वाचे असल्याने पोलीस प्रशासनाने सर्व गणेशोत्सव मंडळे, नागरिक आणि कार्यकर्त्यांना शांतता व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ध्वनीप्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळणे, अफवांवर विश्वास न ठेवणे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करतानाच पोलिसांचा हा खडा पहारा भाविकांसाठी आश्वस्त करणारा ठरत असून रायगडकरांनीही पोलिसांना सहकार्य करत हा विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog