मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

एका साध्या मेसेजमधून मिळालं मोठं बळ..!

आजारी प्रवाशाला रायगड पोलिसांची 'देवदूता'सारखी मदत

प्रवाशाने मानले भावनिक आभार


​पेण-रायगड, दि. १९ (प्रतिनिधी) :- गणेशोत्सवाच्या धामधुमीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र रस्त्यावर सज्ज आहे. याचाच प्रत्यय नुकताच पेण येथे आला असून, प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडलेल्या एका प्रवाशाला रायगड पोलिसांनी तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देत देवदूतासारखा आधार दिला आहे. वेळेत मिळालेल्या उपचारानंतर प्रकृती सुधारताच संबंधित प्रवाशाला सुखरूप पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या संवेदनशील व तत्पर सेवेनंतर प्रवाशाने व्हॉट्सॲप मेसेज पाठवून पोलिसांचे मनापासून आभार मानले असून, “एका साध्या मेसेजमधून आम्हाला मोठं बळ मिळालं,” अशी भावना रायगड पोलिसांनी व्यक्त केली आहे.  

​सध्या सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा उत्साह असून हजारो नागरिक मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमधून एसटी बस तसेच खासगी वाहनांनी कोकणातील आपापल्या गावी रवाना होत आहेत. असाच एक प्रवासी आजारी अवस्थेत गणेशोत्सवासाठी एसटी बसने आपल्या मूळ गावी जात असताना, पेण परिसरामध्ये त्याला अचानक तीव्र त्रास जाणवू लागला. प्रवासादरम्यान उद्भवलेल्या या आजारपणामुळे प्रवासी आणि सहप्रवासी काळजीत पडले. अशा बिकट परिस्थितीत संबंधित प्रवाशाने जराही वेळ न दवडता महाराष्ट्र पोलिसांच्या 'डायल ११२' या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून तातडीची मदत मागितली.  

​हा आपत्कालीन कॉल मिळताच रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई दुरंत चोरगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने संबंधित एसटी बसकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी सर्वप्रथम त्या प्रवाशाला धीर दिला आणि विलंब न करता तात्काळ डॉक्टरांकडे नेऊन आवश्यक ते उपचार मिळवून दिले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे प्रवाशाची प्रकृती काही वेळातच पूर्वपदावर आली. प्रवाशाला आराम वाटू लागल्यानंतर पोलीस अंमलदार चोरगे यांनी त्याला पुन्हा त्याच एसटी बसमध्ये बसवून सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना केले.  

​आपल्या गावी सुखरूप पोहोचल्यानंतर त्या प्रवाशाने पेण पोलिसांना व्हॉट्सॲपवर एक भावनिक मेसेज पाठवला. त्यामध्ये त्याने, "पेण पोलीस स्टेशनचे मन:पूर्वक आभार! मी आजारी अवस्थेत गावी जात असताना अचानक त्रास झाला. त्यावेळी पेण पोलिसांनी त्वरित मदत केली. तुमच्या मदतीमुळे मला मोठा आधार मिळाला. तुमची ही माणुसकी मी कधीही विसरणार नाही. मनापासून धन्यवाद!" अशा शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली. या मेसेजला रायगड पोलिसांनीही तितक्याच संवेदनशीलतेने उत्तर दिले. "जनतेसाठी नेहमी उपलब्ध असणे, त्यांच्या अडचणीच्या काळात तत्परतेने मदत करणे, सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हेच आमचे आद्य कर्तव्य आणि आमचा सेवाभाव आहे. आपल्या प्रेमळ शब्दांनी आम्हाला नवी ऊर्जा मिळते. आपला विश्वास हीच आमची प्रेरणा आणि तो कायम जपण्यासाठी रायगड पोलीस सदैव तत्पर आहे," असे पोलिसांनी नमूद केले. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याला जागत रायगड पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीच्या दर्शनामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog