मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

नागोठणे जवळ सुकेळी येथे महिला व तिच्या कुटुंबाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

'महाराज' म्हणवून घेणाऱ्या वारकऱ्यासह एकाच कुटुंबातील चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

कडक कारवाई न झाल्यास एकलव्य आदिवासी संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा


​रोहा-रायगड, दि. ११ (विशेष प्रतिनिधी) :- नित्यनेमाने हरिपाठाचे पठण करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे पंढरीची पायी वारी करणाऱ्या एका तथाकथित वारकरी महाराजांचा अत्यंत संतापजनक आणि हिंसक चेहरा उघडकीस आल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील सुकेळी येथे घडली आहे. लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या अगदी क्षुल्लक वादातून एका आदिवासी समाजातील महिलेला बेदम मारहाण करत भरचौकात जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ केल्याप्रकरणी, परिसरात 'महाराज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील चौघांविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतांच्या शिकवणीचा आव आणत गळ्यात तुळशीची माळ घालून पायी वारी करणाऱ्या आणि प्रत्यक्षात मात्र एका असहाय्य महिलेवर अत्यंत हीन पातळीवर जाऊन हात उचलणाऱ्या अशा प्रवृत्तींकडून समाजाने नेमका काय बोध घ्यावा, असा संतप्त सवाल आता सुजाण नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुकेळी येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय फिर्यादी महिला या नोकरी करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या कामावरून घरी परतल्या असता, त्यांच्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला गावातील एका मुलीने खेळताना मारल्याचे त्यांच्या पतीने सांगितले. यावरून फिर्यादी महिला संबंधित मुलीला विचारणा करण्यासाठी तिच्या घरासमोर गेल्या असता, तेथील वादात शेजारी राहणारे वारकरी जितेंद्र चंद्रकांत धामणसे (ज्यांना परिसरात अनेकजण 'महाराज' म्हणून ओळखतात) यांनी मध्यस्थी करत फिर्यादी महिलेस दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावर 'तुम्ही आमच्या बायकांच्या वादात पडू नका' असे फिर्यादीने म्हटल्याचा तीव्र राग मनात धरून, स्वतःला महाराज म्हणवणाऱ्या जितेंद्र धामणसे यांनी घरातून बाहेर येत फिर्यादी महिलेची मान पकडून हाताच्या बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली.

​त्यानंतर जितेंद्र धामणसे यांचा मुलगा जिवेश धामणसे यानेही घरातून धावून येत फिर्यादी महिलेला मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचे पती सोडवण्यासाठी पुढे आले असता, आरोपी जितेंद्र धामणसे यांची पत्नी सविता धामणसे व आई चंद्रभागा धामणसे यांनीही तेथे धाव घेत फिर्यादी महिलेला धक्काबुक्की व मारहाण केली. संतांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांच्या घरातूनच एका महिलेवर अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबाने हिंसक हल्ला चढवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावेळी गावाच्या पोलीस पाटील झोलगे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन मध्यस्थी करत हे भांडण सोडवले. मात्र यानंतरही आरोपींची मुजोरी थांबली नाही; फिर्यादी महिला पतीसह घरी जात असताना आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन 'तू कुठून आली आहेस, आदिवासी कातकरी आम्हाला शिकवायला, तुला मारायला नव्हे तर जाळायला पाहिजे' अशा अत्यंत विकृत आणि जातीवाचक शब्दांत सर्वांसमोर विधाने करत जीवे मारण्याची उघड धमकी दिली.

​घटनेच्या दिवशी नागोठणे पोलिसांनी या प्रकरणात केवळ अदखलपात्र (NCR) नोंद केली होती. मात्र, एका महिलेवर झालेला हा अन्याय आणि भररस्त्यात सर्वांसमोर करण्यात आलेला जातीवाचक अपमान याविरोधात फिर्यादीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांच्याकडे रीतसर दाद मागितली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दखलीनंतर आणि पेनड्राईव्हमधील ऑडिओ क्लिपसह सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे, नागोठणे पोलीस ठाण्यात जितेंद्र चंद्रकांत धामणसे, जिवेश जितेंद्र धामणसे, सविता जितेंद्र धामणसे आणि चंद्रभागा चंद्रकांत धामणसे (सर्व रा. सुकेळी, ता. रोहा, जि. रायगड) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) सुधारित अधिनियम १९८९ च्या कलम ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(va) अन्वये रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे हे करत आहेत.

​दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद आदिवासी समाजात उमटले असून रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवर संताप व्यक्त करताना संघटनेचे जिल्हा सचिव रामभाऊ कोळी म्हणाले की, "भांडणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये या महाराजाकडून 'कातकरी कातकरी' असा शब्द वारंवार अपमान करण्याच्या हेतूने उच्चारला गेला आहे. कातकरी समाज खालच्या दर्जाचा आहे का, असे या तथाकथित महाराजाला दाखवायचे आहे. या महाराजांचा इतिहास आणि अभ्यासाची पाटी पूर्णपणे कोरी दिसते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील चिरनेरच्या जंगल सत्याग्रहात पहिली उडी घेणारा कातकरी समाजच होता आणि देशासाठी बलिदान देणारे पहिले हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे याच समाजातील होते, याचा या महाराजाला विसर पडलेला दिसतो. रायगडच्या कातकरी समाजाला केवळ इतिहासच नाही तर स्वतःचा भूगोलही आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या या जितेंद्र धामणसे याला पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अन्यथा रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

Comments

Popular posts from this blog