अलिबाग जिल्हा रूग्णालयाच्या शांतता क्षेत्रात ‘डीजे’चा दणदणाट
प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली
अलिबाग-रायगड, दि. २१ (प्रतिनिधी) :- रुग्णालय परिसरात तसेच रात्रीच्या वेळी शांतता राखण्याचे कडक नियम असतानाही, अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या गणेशोत्सवात रात्रीच्या सुमारास चक्क डीजेचा दणदणाट सुरू असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या आवारात डीजे वाजवू नये, याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घगे यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचना धाब्यावर बसवण्यात आल्याने ‘रुग्णालयात रुग्णांना शांतता आवश्यक असताना मग गणेशोत्सवात डीजेला परवानगी दिलीच कशी?’ असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग जिल्हा रुग्णालय परिसरातील १०० मीटरचा परिसर हा अधिकृतरीत्या शांतता क्षेत्र (सायलन्स झोन) म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. असे असतानाही याच परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालय असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीनिमित्त पाच दिवसांसाठी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. या उत्सवादरम्यान डीजे आणि झगमगत्या लेझर लाइट्सचा वापर करून कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात गाणी वाजवण्यात आली. जिल्हा रुग्णालयात विविध गंभीर आजारांवर उपचार घेणारे रुग्ण, वृद्ध आणि लहान मुले दाखल असताना अशा प्रकारे मोठ्या आवाजात गाणी लावल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालवला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, स्वतः जिल्हा शल्यचिकित्सकांनी डीजे न लावण्याबाबत पूर्वसूचना देऊनही वैद्यकीय शिक्षण घेणारे भावी डॉक्टर आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनीच प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले.
दुसरीकडे, जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या (OPD) इमारतीच्या आवारातही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. मात्र, त्या ठिकाणी कोणताही ध्वनिप्रदूषणाचा प्रकार न करता सर्व नियमांचे पालन करून अत्यंत शांततेत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे एकाच आवारात एका बाजूला नियमांचे पालन होत असताना, दुसऱ्या बाजूला वैद्यकीय विद्यार्थ्यांकडूनच नियम धाब्यावर बसवले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रुग्णालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी शांतता राखणे अत्यंत गरजेचे असताना झालेल्या या प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशी करून शांतता क्षेत्राच्या नियमांचे काटेकोर पालन होते की नाही याकडे लक्ष द्यावे, तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

Comments
Post a Comment