मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून १२ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

 रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


​रसायनी-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी नवनवीन क्लृप्त्या शोधून काढल्या असून, थेट व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून व्यावसायिकांची व नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील नामांकित हिरानंदानी फॉर्च्यून सिटी परिसरात उघडकीस आला आहे. एका अज्ञात सायबर भामट्याने फिर्यादी यांचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक हॅक करून त्यांच्या अकाउंटंटला तब्बल १२ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडून मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील मौजे भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉर्च्यून सिटी येथे राहणाऱ्या फिर्यादी यांच्यासोबत २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक अनाधिकृतरीत्या हॅक केला. त्यानंतर संबंधित हॅकरने फिर्यादी यांच्या अधिकृत खात्यावरून थेट त्यांच्या अकाउंटंटच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेज पाठवले. आपण स्वतः फिर्यादी बोलत असल्याचे भासवून, अत्यंत तातडीचे कारण सांगत अकाउंटंटचा विश्वास संपादन केला. त्यानंतर समोरून देण्यात आलेल्या विशिष्ट बँक खात्यावर (IFSC - FDRL) तातडीने १२ लाख रुपये ऑनलाईन वर्ग करण्यास सांगितले. मेसेज मालकाकडूनच आला असल्याचे समजून अकाउंटंटने कोणतीही शहानिशा न करता तात्काळ १२ लाख रुपयांची रक्कम संबंधित खात्यावर पाठवून दिली.

​काही वेळाने जेव्हा फिर्यादी आणि अकाउंटंट यांच्यात संवाद झाला, तेव्हा असा कोणताही मेसेज फिर्यादी यांनी केला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपले व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून परस्पर पैशांची मागणी करण्यात आल्याचे आणि आपली १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने रसायनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली.

​फिर्यादी यांच्या तक्रारीवरून रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२०२६ नुसार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (२००८ च्या सुधारणेसह) चे कलम ६६ (क), ६६ (ड) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजबळ हे करत आहेत. सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून कोणीही पैशांची मागणी केल्यास प्रथम प्रत्यक्ष फोन करून खात्री करावी, अनोळखी बँक खात्यांवर परस्पर व्यवहार करू नयेत, असे आवाहनही या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog