मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

एसटीच्या तिकीट मशीनमध्ये छेडछाड करून शासनाची फसवणूक!

अलिबाग आगारातील एसटी वाहकावर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


​पोयनाड-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकीट वितरण मशीनमध्ये छेडछाड करून प्रवाशांना एकाच नंबरची बनावट तिकिटे देणे आणि शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवाशांकडून पूर्ण भाड्याची रोख रक्कम घेऊन तपासणी अहवालात मात्र त्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक दाखवणाऱ्या अलिबाग आगाराच्या वाहकावर पोयनाड पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील कोळवे येथील रहिवासी असलेल्या आरोपी वाहकाची अलिबाग आगारात नियुक्ती असून त्याच्याकडे पनवेल बस डेपो येथे विनावाहक व विनाथांबा बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मौजे पोयनाड एसटी स्टॉप येथे हा गैरप्रकार निदर्शनास आला. संबंधित वाहकाने महामंडळाने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक तिकीट वितरण मशिनमध्ये नियमबाह्य छेडछाड केली आणि बसमधील तब्बल १० प्रवाशांना एकाच क्रमांकाची बनावट तिकिटे वितरित केली.
​स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आणि महामंडळाचा महसूल हडपण्यासाठी आरोपीने निरीक्षण अहवालामध्ये सदर १० प्रवासी हे शासनाच्या सवलतीस पात्र असणारे 'अमृत ज्येष्ठ नागरिक' असल्याचे खोटे नमूद केले. प्रत्यक्षात मात्र त्याने सर्व प्रवाशांकडून तिकिटाचे पूर्ण पैसे रोख स्वरूपात स्वीकारले होते. ही संपूर्ण रोख रक्कम महामंडळाच्या तिजोरीत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केली.
​या संपूर्ण अफरातफरी प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात आरोपी वाहकाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ९०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(५), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२) आणि ३४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog