रत्नागिरीत 'मिशन फिनिक्स' अंतर्गत पोलिसांची धडक कारवाई!
एमआयडीसी परिसरातून गांजासह ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी, दि. २६ (प्रतिनिधी) :- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांना मोठे यश आले आहे. 'मिशन फिनिक्स' अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका संशयिताला रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी असा एकूण ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक जे.के. फाईल आणि एमआयडीसी परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित इसम हालचाली करताना दिसून आला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ या इसमाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी व अंगझडती घेतली. त्यावेळी सदर इसमाकडे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला बेकायदेशीर गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी तत्परता दाखवत त्याच्या ताब्यातील गांजा तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ६४,००० रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केला आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी केली असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Post a Comment