लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राज्यात सलग दोन महिने अव्वल!
ऑनलाईन सेवा व नागरिक समाधानात मारली बाजी
रत्नागिरी, दि. ६ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम' अंतर्गत ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावत सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जून आणि जुलै २०२६ या दोन्ही महिन्यांत नागरिकांना विविध ऑनलाईन सेवा वेळेत पुरवणे आणि त्यांच्या समाधानाची पातळी उंचावणे यामध्ये रत्नागिरी पोलिसांनी अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या या मूल्यांकनात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने 'सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी सेवा' (Overall Top Performing Service) आणि 'नागरिकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळालेली सेवा' (Service with Highest Citizen Score) या दोन्ही महत्त्वपूर्ण श्रेणींमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जलद सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांचा दृढ विश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ही दैदिप्यमान यशोगाथा घडवून आणली आहे.
या कामगिरीमध्ये विशेष योगदान ठरले आहे ते 'मिशन रॅपिड' (Mission RAPID) आणि 'रत्नासेतू चॅटबॉट' (Ratnasetu Chatbot) यांसारख्या आधुनिक उपक्रमांचे. या नावीन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत अत्यंत जलद, सुलभ, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली व मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या निष्ठावंत आणि उत्कृष्ट कार्यामुळे हे यश शक्य झाले आहे. या यशाबद्दल बोलताना पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, भविष्यातही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव कटिबद्ध राहील.

Comments
Post a Comment