चांभार्ली येथे बंद घर फोडून चोरट्यांनी दागिने लांबवले!
रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रसायनी, दि. ६ (प्रतिनिधी) :- रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना चांभार्ली येथील इंद्रप्रस्थ सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक १२ मध्ये घडली. २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपासून ते २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या दरम्यान, फिर्यादी यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्याने घरावर डोळा ठेवला होता. फिर्यादी घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात गैरकायदेशीरपणे शिरकाव केला आणि चोरटे घरअतिक्रमण करून घरात प्रवेश मिळवला.
त्यानंतर घरातील कपाटात अत्यंत सुरक्षितपणे ठेवलेले किमती सोन्या-चांदीचे दागिने फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या हेतूने चोरून नेले. या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी जेव्हा घरी परतले तेव्हा चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या घटनेप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं. १३३/२०२६ नुसार करण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाचकर हे या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत असून अज्ञात चोरट्याचा कसून शोध सुरू आहे.

Comments
Post a Comment