सांगलीच्या मयुरी बामणे यांचा रायगड पोलीस बँड पथकापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
जिद्द आणि सुरांची साथ
रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रामाणिक मेहनत, तीव्र इच्छाशक्ती आणि चिकाटीची गरज असते. हेच आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे रायगड पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई मयुरी पार्वती तुकाराम बामणे यांनी. मूळच्या सांगली येथील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय मयुरी बामणे यांनी बी.कॉम. पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना पोलीस बँड पथकामध्ये महिलांनाही वादनाची संधी उपलब्ध असते, ही बाब समजल्यानंतर त्यांच्या मनात वाद्य वादनाविषयीची विशेष आवड आणि उत्सुकता निर्माण झाली. याच प्रेरणेतून त्यांनी सुरांच्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निश्चय केला.
आपल्या आवडीला ध्येयाचे रूप देत मयुरी बामणे यांनी सांगली येथील प्रसिद्ध मार्गदर्शक तुकाराम आईवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाद्य वादनाचे शास्त्रशुद्ध धडे घेण्यास सुरुवात केली. नियमित रियाज, अथक सराव आणि अपार कष्ट यांच्या जोरावर त्यांनी आपल्या वादनात सफाई आणली आणि त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणित होत गेला. त्यांच्या याच निष्ठेचे आणि कौशल्याचे फलित म्हणून २०२४ मध्ये त्यांची रायगड जिल्हा पोलीस बँड पथकासाठी अधिकृत निवड करण्यात आली.
निवडीनंतर मयुरी यांनी तब्बल सात महिन्यांचे खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कालावधीत त्यांनी केवळ विविध वाद्ये वाजवण्याचे बारकावे आणि ताल-लयाची शास्त्रोक्त सांगडच आत्मसात केली नाही, तर पोलिसांच्या कडक शिस्तीचेही उत्कृष्ट धडे गिरवले.
सध्या महिला पोलीस शिपाई मयुरी बामणे या पोलीस दलातील विविध संचलने, शासकीय महत्त्वाचे कार्यक्रम आणि सलामी समारंभांमध्ये आपल्या सुरांच्या साथीने मोलाचे योगदान देत आहेत. इतकेच नव्हे तर ऐतिहासिक आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातही त्यांना वादन करण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, त्यांनी आपल्या कलेने उपस्थितांची मने जिंकली आहेत. "आपल्या आवडीला जर कठोर मेहनतीची जोड मिळाली, तर स्वप्नांना यशाची अचूक दिशा मिळते," हा विश्वास मयुरी बामणे यांच्या या यशोगाथेतून अधोरेखित होतो. त्यांचा हा प्रवास पोलीस दलातील तसेच समाजातील अनेक तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment