मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

खाजगी वाहनांवर 'पोलीस, प्रेस, आर्मी' स्टिकर वापरणाऱ्यांवर आता वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा!

मोटार वाहन कायद्यानुसार होणार थेट दंडात्मक कारवाई


मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) :- रस्त्यांवरून धावणाऱ्या खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘प्रेस’, ‘पोलीस’, ‘आर्मी’, 'महाराष्ट्र शासन', भारत सरकार' किंवा ‘शासकीय’ अशी अक्षरे किंवा स्टिकर्स लावून फिरणाऱ्या वाहनधारकांची आता खैर उरलेली नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आणि नंबर प्लेटसह वाहनाच्या इतर भागांवर अनधिकृतपणे असे स्टिकर्स लावणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून तीव्र मोहीम हाती घेण्यात येत आहे. अनेकदा वैयक्तिक वाहनांवर वृत्तपत्रांचे नाव किंवा केवळ ‘PRESS’ असे मोठ्या अक्षरांत लिहून मोठेपणाचा दिखावा करणे, पोलीस कारवाईपासून वाचणे अथवा समाजात वेगळा रुबाब दाखवणे यासाठी या स्टिकर्सचा गैरवापर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही पत्रकाराच्या किंवा नागरिकाच्या वैयक्तिक वाहनावर असे स्टिकर्स लावणे हा थेट वाहतूक नियमांचा भंग असून त्याविरोधात कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

​केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० आणि नियम ५१ नुसार वाहनावरील नोंदणी क्रमांक म्हणजेच नंबर प्लेट कशी असावी, याचे स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. नियम ५० नुसार वाहनावर केवळ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी असणे बंधनकारक असून त्यावर इंग्रजी अक्षरे आणि अंकांव्यतिरिक्त कोणताही इतर मजकूर लिहिण्यास सक्त मनाई आहे. तर नियम ५१ नुसार नंबर प्लेटच्या आजूबाजूला किंवा वाहनाच्या काच आणि बॉडीवर कोणत्याही पदाचे नाव, संस्था, धार्मिक चिन्हे, देव-देवतांची नावे किंवा ‘प्रेस’सारखे शब्द छापणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १७७ आणि सुधारित नियम १७७ (अ) अंतर्गत या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असून, नंबर प्लेटच्या स्पष्टतेत अडथळा आणल्यास कलम १९२ अन्वये देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. उच्च न्यायालयाने देखील विविध याचिकांवर सुनावणी करताना खाजगी वाहनांवर अशा प्रकारचे अनधिकृत स्टिकर्स किंवा पाट्या लावण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे स्पष्ट आदेश राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत.

​केवळ मीडिया हाऊसच्या नावे अधिकृतरीत्या नोंदणीकृत असलेल्या आणि वृत्तसंस्थेच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना सोडून, पत्रकारांच्या वैयक्तिक किंवा खाजगी वाहनांवर ‘प्रेस’ लिहून फिरणे हा नियमांचा भंग मानला जातो. अनेकदा या स्टिकर्सच्या नावाखाली गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक किंवा अनधिकृत व्यक्ती पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे खऱ्या आणि अधिकृत पत्रकारांच्या प्रतिमेलाही बाधा पोहोचते. या कारवाईअंतर्गत पहिल्यांदा नियम तोडणाऱ्या वाहनधारकाला पाचशे ते एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत असून, पुनरावृत्ती झाल्यास दीड हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि वाहनावरील स्टिकर तात्काळ काढून घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी, आणि पत्रकारांनी आपल्या वैयक्तिक वाहनांवरील असे बेकायदेशीर स्टिकर्स स्वतःहून काढून टाकावेत, तसेच पोलिसांनीही स्वतःच्या खाजगी वाहनावरील स्टिकर्स काढून टाकावेत आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog