मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रायगड जिल्हा पोलिसांच्या ‘प्रेरणा’ उपक्रमातून आदिवासी विद्यार्थ्यांना नवी दिशा!

अंधश्रद्धा आणि बालविवाहाविरोधात जनजागृती

उत्तेखोल आश्रमशाळेत जनजागृतीसह सामाजिक कार्यकर्ते भिवा पवार यांचा सपत्नीक गौरव


​माणगाव-रायगड, दि. २० (विशेष प्रतिनिधी) :- अंधश्रद्धेच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे, बालविवाहाच्या जोखडातून मुक्त करून विद्यार्थ्यांना मोठ्या स्वप्नांची भरारी घेण्याचे बळ देणारे आणि संघर्षातून उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारे ‘प्रेरणा - एक पाऊल प्रकाशाकडे’ हे अभियान रायगड जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही ‘प्रेरणा’ मोहीम आता केवळ एका उपक्रमापुरती मर्यादित न राहता, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी एक सशक्त सामाजिक चळवळ ठरत आहे. याच अभियानांतर्गत उत्तेखोल (ता. माणगाव) येथील आश्रमशाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जेथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व भारलेल्या वातावरणात पार पडला.










​या उपक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी दुर्गम भागातील भावी पिढीला बालविवाहाचे दुष्परिणाम समजावणे, समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची व कायद्यांची जाणीव करून देणे हा आहे. उत्तेखोल आश्रमशाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी आणि शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रांत करिअरच्या उत्तुंग संधी कशा प्राप्त कराव्यात, याबाबत सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याच वेळी ‘प्रीझम’ संस्था (अलिबाग) व ‘विवा’ संस्था (माणगाव) यांच्या कलाकारांनी व्यसनमुक्तीवर प्रभावी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना व्यसनांपासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

​दरम्यान, रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सातत्याने सामाजिक कार्य करणारे तसेच रायगड पोलीस दल आणि आदिवासी समाज यांच्यामध्ये परस्पर विश्वास, सहकार्य आणि सुरक्षिततेची नवी दिशा निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. भिवा पवार यांच्या कार्याची या वेळी विशेष दखल घेण्यात आली. त्यांनी समाजासाठी दिलेल्या या अमूल्य योगदानाबद्दल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्याकडून त्यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. शशिकांत पवार व माणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पर्यावरणाचा संदेश देणारे रोपटे देऊन श्री. भिवा पवार यांचा सपत्नीक जाहीर गुणगौरव करण्यात आला. यासोबतच माणगाव रिक्षा संघटना अध्यक्ष नामदेव खराडे आणि समाजसेवक संजय अण्णा साबळे यांनीही श्री. भिवा पवार यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

​या प्रेरणादायी कार्यक्रमास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सरकारी वकील ॲड. योगेश तेंडुलकर, ॲड. सृष्टी गुरव, डॉ. दीपक देशमुख, सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे, समाजसेवक संजय साबळे, आदिवासी समाजातील पहिल्या वकील ॲड. सपना वाघमारे, वनवासी कल्याण आश्रमचे सचिव नितीन चांदोरकर, आश्रमशाळा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अरुण पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक उत्तम पाटील, अधीक्षक विलास देगावकर, एकलव्य संघटनेचे सचिव राम कोळी, मारुती पवार, इंदिरा पवार, आदिवासी समाजाचे युवा अध्यक्ष त्रिभुवन पवार, काशिनाथ वाघमारे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पोलीस बांधव, वनवासी कल्याण आश्रम शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुसूत्र व ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन वनवासी कल्याण आश्रम शाळेतील शिक्षक अंकुश काळे यांनी उत्तम पद्धतीने केले. या सर्वसमावेशक व स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog