पोयनाड हद्दीतील शहाबाज येथून ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल लंपास!
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
पोयनाड-रायगड, दि. १५ (प्रतिनिधी) :- पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मरमधील मौल्यवान साहित्याची चोरी होण्याच्या घटना समोर येत असून, शहाबाज येथील वेरिटास इन्फ्रा कंपनीच्या मोकळ्या जागेत बसवण्यात आलेल्या ६३ केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे २५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असून, या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील शहाबाज परिसरात असलेल्या वेरिटास इन्फ्रा कंपनीच्या मोकळ्या जागेत डीटीसी क्रमांक १३८४३२० चा ६३ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होता. हा ट्रान्सफॉर्मर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तसेच सोगांव मुनवली (ता. अलिबाग) येथील फिर्यादी यांच्या संयुक्त देखरेखीखाली होता. दरम्यान, अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व लबाडीच्या हेतूने संधी साधून या ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे २५ हजार ५०० रुपये किमतीची तांब्याची (कॉपर) कॉईल शिताफीने तोडून चोरून नेली. ट्रान्सफॉर्मरमधील कॉईल चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाली.
या घटनेनंतर सोगांव मुनवली येथील संबंधित फिर्यादी यांनी तात्काळ पोयनाड पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोयनाड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नवनाथ म्हात्रे हे करत असून, परिसरातील संशयितांचा आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा वेगाने कार्यरत झाली आहे.

Comments
Post a Comment