लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रोहा-रायगड, दि. १५ (प्रतिनिधी) :- रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रोहा तालुक्यातील पिंगळसई येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही, नंदप आदिवासीवाडी (पोस्ट चणेरा, ता. रोहा) येथील आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. आरोपीने पीडितेला रोहा येथील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात नेले आणि 'मी तुझ्याशीच लग्न करेन, तुला कधीही फसवणार नाही' असा खोटा विश्वास दिला. पीडितेच्या अज्ञानाचा आणि अल्पवयीन असण्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या सततच्या शोषणातून पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने रोहा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(आय), ६५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ चे कलम ४, ६, ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील करत आहेत.

Comments
Post a Comment