पेणमध्ये सायबर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस!
बँक खाती भाड्याने देऊन कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल
पेण-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- सायबर फसवणुकीच्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या एका टोळीचा पेण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पैशांचे आमिष दाखवून बँक खाती मिळवणाऱ्या आणि त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या पेण परिसरातील तब्बल १२ जणांवर पेण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे स्थानिक पातळीवर कसे पसरले आहेत, हे समोर आले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा संपूर्ण आर्थिक फसवणुकीचा प्रकार १ नोव्हेंबर २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत मौजे पेण येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत घडला. या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ ते १२ यांनी आपापसात संगनमत करून सायबर गुन्ह्यातून मिळणारी रक्कम गोळा करण्याचा कट रचला होता. त्यानुसार आरोपी क्रमांक १ ते ९ यांनी पैशांच्या अमिषाला बळी पडून स्वतःच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाती उघडली. ही सर्व बँक खाती त्यांनी आरोपी क्रमांक १० व ११ यांना वापरासाठी दिली. त्यानंतर आरोपी क्रमांक १० आणि ११ यांनी आरोपी क्रमांक १२ याच्या मदतीने या नऊ बँक खात्यांचा गैरवापर सुरू केला.
या खात्यांवर देशभरातील निरपराध नागरिकांची सायबर फसवणूक करून मिळवलेली लाखो रुपयांची रक्कम वळती करण्यात येत होती. रक्कम जमा होताच ती तातडीने इतर अनोळखी बँक खात्यांवर हस्तांतरित करून सायबर गुन्हेगारीचे मोठे जाळे चालवले जात होते. या माध्यमातून सर्वसामान्यांची प्रचंड आर्थिक लूट झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २१०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही आर्थिक अमिषाला बळी पडून आपली बँक खाती, पासबुक किंवा एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक नवरखेडे करीत आहेत.

Comments
Post a Comment