नागोठणे शहरात ग्रामपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम!
अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी दिली चार दिवसांची मुदत
नागोठणे-रायगड, दि. २५ (महेंद्र माने) :- नागोठणे शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी २४ ऑगस्ट रोजी धडक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सर्व संबंधित अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी चार दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून तशा लेखी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. ही मोहीम सरपंच सुप्रिया महाडीक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे आणि माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली.
नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा तसेच छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ आणि लगतच्या परिसरामध्ये व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर वाढवलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीने सुरुवातीला दोन दिवस रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकाद्वारे व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटवण्याबाबत आवाहन केले होते.
त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईची पूर्वतयारी म्हणून सोमवारी सकाळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संबंधित भागात प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान सर्व अतिक्रमणधारक व व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष सूचना देत लेखी नोटीस बजावण्यात आली.
या मोहिमेदरम्यान दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत संबंधितांनी आपले वाढीव अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने थेट कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी यावेळी दिला. या धडक मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, सदस्या भविका गिजे, अमृता महाडीक, ज्योती राऊत, विनीता पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments
Post a Comment