मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सर्व सण आणि उत्सव सामाजिक सलोखा, बंधुभाव व शांततेत साजरे करा : सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांचे आवाहन

 शांतता कमिटी बैठकीत केले आवाहन 


​नागोठणे-रायगड, दि. २५ (महेंद्र माने) :- आगामी काळात साजरे होणारे विविध सण व उत्सव हे सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांततेचे प्रतीक ठरले पाहिजेत, असा संदेश देत नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून उत्सव उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी केले आहे. नागोठणे पोलीस ठाण्यात शनिवार, २२ ऑगस्ट रोजी आगामी ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी व मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्या, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

​या बैठकीत निलोफर पानसरे, सोपान जांबेकर, एकनाथ ठाकूर, किशोर म्हात्रे, बाळू रटाटे, नंदाताई गायकवाड, राजेश्री टके, सुजाता जवके, धनंजय जगताप, अजगर सय्यद, पंकज कोकाटे, काझीम पानसरे, अफजल पटेल, संतोष जैन, संजय अधिकारी, अकबर पठाण यांच्यासह परिसरातील नागरिक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी सांगितले की, सर्व उत्सव शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पडले पाहिजेत. मिरवणूक काढण्यापूर्वी संबंधित मंडळांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून आवश्यक त्या सर्व परवानग्या वेळेत घ्याव्यात तसेच परवानगीतील सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे. मिरवणुकीदरम्यान ध्वनीक्षेपकाचा वापर शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेतच करावा, जेणेकरून वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना कोणताही त्रास होणार नाही. मिरवणुकीत सहभागी तरुणांनी शिस्त व संयम बाळगून दुचाकी किंवा चारचाकी वाहनांद्वारे धोकादायक स्टंट्स करू नयेत, तसेच मिरवणूक मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी.

​याशिवाय कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारच्या घोषणा, गाणी, पोस्टर्स अथवा आक्षेपार्ह कृती पूर्णपणे टाळाव्यात. सोशल मीडियावर कोणत्याही अफवा, आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ अथवा फोटो प्रसारित करू नयेत आणि असा प्रकार कुठेही निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. नारळी पौर्णिमा उत्सवादरम्यान नदीकिनारी अथवा जलस्रोतांजवळ लहान मुले, वृद्ध व्यक्ती व महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी साजरी करताना पथकातील गोविंदांना दुखापत होऊ नये यासाठी खाली मॅटचा वापर करावा आणि लहान मुलांसाठी सुरक्षेची सर्व साधने सक्तीने वापरावीत. विसर्जन घाटांवर पुरेशा दिव्यांची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी. सर्व सण-उत्सवांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी आणि उत्सव मंडळांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी रवींद्र पारखे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog