म्हसळा परिसरातील श्री सोमेश्वर मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला!
कुलूप तोडून रोख रक्कम लंपास
म्हसळा-रायगड, दि. २० (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खरसई आणि आगरवाडा गावच्या सीमेवरील वरवटणे पुलाजवळ, आयटीआय कंपाऊंडच्या बाजूला नदीकिनारी वसलेल्या प्रसिद्ध भगवान शंकराच्या श्री सोमेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. अज्ञात चोरट्याने मंदिरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटीचा मागील पत्रा उचकटून त्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेली अंदाजे दोन हजार रुपयांची रोकड, ज्यामध्ये विविध नोटा व नाण्यांचा समावेश होता, ती चोरून पळ काढला. गावकरी आणि विश्वस्तांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना गजाआड करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भुंडरे हे करत आहे.

Comments
Post a Comment