मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

माणगाव तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले!

निजामपूर परिसरात खळबळ, अज्ञात इसमांवर अपहरणाचे गुन्हे दाखल


​माणगाव-रायगड (प्रतिनिधी) :- माणगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील निजामपूर येथून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमांनी फुस लावून पळवून नेल्याची अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी एकाच गावात या दोन्ही घटना घडल्याचे समोर आल्याने संपूर्ण निजामपूर व माणगाव परिसरात पालकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही प्रकरणांत पीडित मुली अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही त्यांना फसवून किंवा अमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याचा संशय असून, माणगाव पोलिसांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

​पहिल्या घटनेत २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास निजामपूर येथील एका महिला फिर्यादी यांच्या राहत्या घरातून त्यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. मुलगी घरात आढळून न आल्याने नातेवाइकांनी तिचा आजूबाजूला आणि परिसरात कसून शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर फिर्यादी महिलेने माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २४३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वराडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्या संबंधित परिसरातील माहिती गोळा करत आहेत.

​दरम्यान, या घटनेची चर्चा सुरू असतानाच त्याच दिवशी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास निजामपूर येथील दुसऱ्या एका फिर्यादी यांच्या घरातून त्यांची १७ वर्षीय अल्पवयीन बहीण अचानक बेपत्ता झाल्याचे समोर आले. नातेवाइकांनी तिचाही विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून आली नाही. अखेर अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर तिच्या भावाने माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर २४४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) नुसार दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तळेकर या करत आहेत. एकाच दिवशी आणि लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे माणगाव पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली असून, दोन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Comments

Popular posts from this blog