मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

खोपोली बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास

 अज्ञात चोरावर गुन्हा दाखल 

​

खोपोली-रायगड, दि. ३१ (प्रतिनिधी) :- खोपोली शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोराने अत्यंत हुशारीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पेण तालुक्यातील वरसई जवळील वाशिवली येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार महिला खोपोली बसस्थानकात आल्या होत्या. त्या खोपोली ते पेण या मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बस (क्रमांक एम.एच. २० बी.एल. ३११७) मध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा अज्ञात चोरट्याने घेतला. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत असताना अज्ञात आरोपीने फिर्यादी महिलेच्या नकळत आणि त्यांच्या संमतीशिवाय गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे छोटे मंगळसूत्र स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. बसमध्ये बसल्यानंतर गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली.

​या तक्रारीच्या आधारे खोपोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या बसस्थानकात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कांबळे करत असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog