FDA चा मोठा दणका : महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांवर आता कडक नजर!
तुकाराम मुंढेंकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) :- राज्यातील रुग्णांना सुरक्षित आणि गुणवत्तेचे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व परवानाधारक रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवर आता प्रशासनाची कडक नजर असणार आहे. एफडीएने प्रथमच अशा प्रकारचा एक सर्वसमावेशक आदेश जारी केला असून, यामध्ये रक्तदान शिबिरांच्या आयोजनापासून ते रक्ताच्या वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यासाठी कडक नियमावली (प्रोटोकॉल) निश्चित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक रक्तपेढ्या 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स रूल्स, १९४५' च्या 'शेड्यूल एफ, पार्ट XII-बी' मधील तरतुदींचे योग्य प्रकारे पालन करत नसल्याचे एफडीएच्या तपासणीत समोर आले होते. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या नवीन नियमांनुसार, वैध परवान्याशिवाय कोणत्याही केंद्राला रक्त संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे, साठवणूक करणे किंवा वितरण करण्याचे अधिकार असणार नाहीत. औषध कायद्यांतर्गत मानवी रक्त आणि त्याच्या घटकांना 'औषध' (Drugs) म्हणून वर्गीकृत करण्यात आले असल्याने या नियमांचे पालन करणे प्रत्येक केंद्रासाठी बंधनकारक आहे.
या संदर्भात बोलताना एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, "सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. रक्तदान करणारा दाता आणि रक्त मिळवणारा रुग्ण या दोघांनाही उच्च दर्जाचे आणि सुरक्षित रक्त मिळायला हवे. सर्व रक्तपेढ्यांच्या कामात एकसूत्रता, पारदर्शकता आणि गुणवत्ता राखली जावी, या उद्देशानेच हे कडक आदेश जारी करण्यात आले आहेत."
नव्या आदेशातील मुख्य अटी व नियम
कर्मचाऱ्यांची अनिवार्य नियुक्ती: प्रत्येक रक्तपेढीमध्ये पात्र वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका आणि समुपदेशक यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
पाच मुख्य चाचण्या बंधनकारक : गोळा केलेल्या रक्ताच्या प्रत्येक युनिटची HIV, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, सिफिलीस आणि मलेरिया या पाच गंभीर आजारांसाठी तपासणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
ई-रक्तकोश पोर्टलवर दैनंदिन नोंद : रक्तपेढ्यांना त्यांच्याकडील रक्ताचा साठा, आवक-जावक आणि इतर तपशील रोजच्या रोज 'eRaktKosh' या शासकीय पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.
गुणवत्ता आणि साठवणूक : रक्ताची साठवणूक योग्य तापमानात (Cold Chain) व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. संशयास्पद किंवा दूषित रक्ताचे युनिट्स तात्काळ वेगळे (Quarantine) ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रक्तदान शिबिरांचे नियम : रक्तदान शिबिरांचे आयोजन करताना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी, रक्ताची सुरक्षित वाहतूक आणि शिबिरोत्तर अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील रक्तपेढ्यांचा भोंगळ कारभार बंद होईल आणि रुग्णांना सुरक्षित रक्त मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Post a Comment