कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी गजाआड!
रोहा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
दोन आरोपींना अटक
रोहा-रायगड, दि. १५ (किरण मोरे) :- बचतगट, लघुउद्योग तसेच व्यावसायिक गरजांसाठी कमी कालावधीत सहज कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा रोहा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत दोन सराईत आरोपींना पनवेल व नवी मुंबई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, महागडी चारचाकी गाडी, मोबाईल फोन आणि बनावट कागदपत्रांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रोहा तालुक्यातील सुडकोली येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्री. लियाकत महंमद खोत यांनी याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. वर्तमानपत्रात आलेल्या एका जाहिरात पत्रिकेत 'समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस' तर्फे महिला बचतगट, लघुउद्योग आणि व्यावसायिकांसाठी ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून दिले जाईल, असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. ही जाहिरात पाहून तक्रारदारांनी त्यातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, आरोपींनी त्यांना तब्बल २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले. त्यानंतर कर्ज प्रक्रियेच्या विविध कारणांसाठी तक्रारदाराकडून वेळोवेळी एकूण ४६ हजार ४०० रुपये उकळण्यात आले. एवढेच नव्हे तर 'विजयलक्ष्मी पतसंस्था मर्यादित, पालघर' या पतसंस्थेच्या नावाने बनावट शेअर्स दिल्याचे तसेच कर्ज मंजूर झाल्याचे भासवून खोटी व बनावट कागदपत्रे देऊन त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. अभय शेलार यांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिवराम खाडे, पोलीस नाईक कैलास बेल्हेकर, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील आणि अमित चाळेकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून शोध घेत पनवेल व नवी मुंबई परिसरात सापळा रचला. या कारवाईत ओमकार रविंद्र हटले (वय ४० वर्षे, सध्या रा. बदलापूर, जि. ठाणे, मूळ रा. गोठणे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) आणि गौरव संतोष मयेकर उर्फ भालचंद्र रघुनाथ पालव (वय ३४ वर्षे, सध्या रा. उलवे, नवी मुंबई, मूळ रा. मठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या दोघांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या दोन्ही आरोपींचा गुन्हेगारी पूर्वइतिहास समोर आला असून, त्यांच्याविरोधात यापूर्वीही नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे तब्बल ७ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ५ लाख रुपये किमतीची ह्युंदाई वेन्यू कार (क्रमांक MH-05/BL-0015), ६० हजार रुपयांची रोख रक्कम, प्रत्येकी १ लाख रुपये किमतीचे दोन सॅमसंग झेड फोल्ड (Fold 4 आणि Fold 5) मॉडेलचे महागडे मोबाईल फोन, विविध पतसंस्थांच्या नावाचे बनावट रबरी शिक्के, पावती पुस्तके (रिसिट बुक), नागरिकांना दिलेल्या बनावट पावत्या, आधारकार्ड, बँक चेकबुक व पासबुक अशी महत्त्वाची बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.
सखोल तपासादरम्यान या आरोपींनी रोहा परिसरातील तब्बल २३ हून अधिक नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे उघडकीस आले असून या फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या टोळीकडून आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा, तसेच कोणत्याही अज्ञात व्यक्ती अथवा जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू नये, असे जाहीर आवाहन रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment