रोहा तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करा
फार्म हाऊस आणि अलिशान मालमत्तांवरून रोह्यात तीव्र संताप
रोहा-रायगड, दि. १३ (किरण मोरे) :- सन २००० सालापासून रोहा तालुक्यात कार्यरत असलेल्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेत झालेली अफाट वाढ सध्या संपूर्ण तालुक्यात प्रचंड चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. रोहा तालुक्यामध्ये विविध शासकीय विभागांमध्ये सेवा बजावणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप आता नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तालुक्याच्या विविध भागांत उभी राहिलेली भव्य फार्म हाऊस, अलिशान बंगले आणि शेतजमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमागे या अधिकाऱ्यांचा मोठा हात असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
गेल्या दोन दशकांत रोहा तालुक्याचा औद्योगिक आणि आर्थिक विस्तार वेगाने झाला. या काळात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी प्रशासकीय यंत्रणेमार्फत खर्च करण्यात आला. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी अनेक अधिकाऱ्यांचे स्वतःचे आर्थिक जीवनमान अवघ्या काही वर्षांत कमालीचे उंचावल्याचे दिसून येत आहे. रोहा परिसरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी, पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे फार्म हाऊस आणि विविध उद्योगांमध्ये केलेली गुप्त गुंतवणूक या सर्वांमागे सन २००० पासून तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या किंवा वारंवार येथेच बदल्या करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी सन २००० सालापासून जमा केलेल्या मालमत्तेची प्रामाणिक आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी आणि लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणांनी रोहा तालुक्यातील या सर्व संशयास्पद अधिकाऱ्यांच्या, त्यांच्या नावे किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या फार्म हाऊस आणि इतर स्थावर मालमत्तांची श्वेतपत्रिका काढून सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. शासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन चौकशीचे आदेश न दिल्यास येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Comments
Post a Comment