कफ परेड पोलिसांची धडक कारवाई!
उघड्या घरातून मंगळसूत्र व रोकड लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद
संपूर्ण मुद्देमाल हस्तगत
मुंबई, दि. ३१ (रणजीत मस्के) :- दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेत घरात घुसून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात कफ परेड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून विकेश ठवरू चव्हाण (वय २७, रा. ट्रांजिस्ट कॅम्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ परेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संजय आनंद चव्हाण (वय २६) हे २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री आपल्या घरी झोपले असताना नजरचुकीने त्यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिला होता. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या उघड्या घरात प्रवेश करून सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही बाब लक्षात येताच तक्रारदारांनी कफ परेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. फुटेजमध्ये पहाटे पाचच्या सुमारास एक संशयित इसम फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्या इसमाबाबत अधिक माहिती गोळा केली असता तो परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी त्याच्या निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तेथे आढळून आला नाही.
पोलिसांनी हार न मानता आरोपीच्या परिसरात सलग दोन दिवस पाळत ठेवून सापळा रचला. अखेर आरोपी गीता नगर परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळताच पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवत पोलिसी खाक्याने कसून चौकशी करताच त्याने उघड्या घरातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पंचनाम्याअंतर्गत चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त (दक्षिण परिमंडळ ०१), सहाय्यक पोलीस आयुक्त (कुलाबा विभाग), कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार पाटील, फड, खामकर, पोलीस शिपाई पाथरूट, जाधव तसेच तांत्रिक मदत करणारे पोलीस शिपाई बंडगर यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कफ परेड पोलीस करत आहेत.


Comments
Post a Comment