मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

नशामुक्त रायगडसाठी पोलिसांचे पाऊल! 

'कॅम्पस कनेक्ट' अभियानाचा रसायनीतील पिल्लई कॉलेजमधून शुभारंभ

 रायगड पोलिसांचा अभिनव उपक्रम 


रोहा-रायगड, दि. १४ (प्रतिनिधी) :- ​रायगड जिल्ह्यातील युवाशक्तीला नशा आणि अमली पदार्थांच्या घातक विळख्यातून दूर ठेवण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पोलीस दलाच्या वतीने 'CAMPUS CONNECT' या अत्यंत अभिनव आणि विशेष जनजागृती अभियानाची धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे. रसायनी येथील प्रसिद्ध पिल्लई कॉलेजमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आजचा तरुण हा देशाचे भविष्य असून त्याला व्यसनाधीनतेपासून वाचवणे आणि समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचवणे काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या पुढाकाराने पोलिसांनी थेट महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये थेट संवाद, योग्य मार्गदर्शन आणि परस्पर समन्वयाचे एक मजबूत जाळे निर्माण केले जात आहे.

​महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण वर्गात अमली पदार्थांच्या होणाऱ्या भीषण दुष्परिणामांबाबत सखोल जागृती निर्माण करणे हा या 'कॅम्पस कनेक्ट' अभियानाचा मुख्य पाया आहे. यासोबतच तरुणांना व्यसनापासून पूर्णपणे दूर ठेवून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी आणि उत्तम जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, तसेच “नशामुक्त कॅम्पस–सुरक्षित भविष्य” ही संकल्पना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजवणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे. या उपक्रमादरम्यान तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी गेल्यास आरोग्यावर आणि भविष्यावर होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती दिली जात आहे. "नशा सोडा, जीवन जोडा" असा महत्त्वपूर्ण संदेश देत रायगड पोलीस प्रशासनाने सर्व नागरिक, शिक्षक आणि पालकांना "चला, एकत्रितपणे घडवूया नशामुक्त रायगड" या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, रायगड पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत आणि कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog