वासगाव जंगलातील थरार; गोवंशीय जनावराचे मांस जप्त!
तिघांना पाठलाग करून घेतले ताब्यात
नागोठणे पोलिसांची दमदार कामगिरी
नागोठणे-रायगड, दि. ३ (महेंद्र माने) :- नागोठणे पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वासगाव जंगलात धाड टाकून गोवंशीय जनावराचे मांस जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३०,६६० रुपये किमतीच्या मुद्देमालासह पळून जाणाऱ्या तीन आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल संपूर्ण नागोठणे परिसरातून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे आणि त्यांच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुरुवार, २ जुलै रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नागोठणे मिरानगर गावच्या मागील जंगल भागात गुरांची अवैध कत्तल सुरू आहे. या माहितीची खात्री करून पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर अधीक्षक अभिजीत शिवतरे आणि रोहा उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. स.पो.नि. रवींद्र पारखे, पी.एस.आय. राजहंस नागदिवे, पी.एस.आय. नरेश थळकर, पोलीस हवालदार अथर्व पाटील, चंद्रशेखर नागावकर, मनोहर माळी, पोलीस शिपाई स्वप्नील भालेराव व बळी पुटेवाड यांच्या पथकाने दोन पंचांसह मिरानगर गावच्या मागील जंगल भागात, वासगाव रस्त्यावरील को.ए.सो. हायस्कूलच्या पुढील माळरानावरील झाडीझुडपात छापा टाकला. त्यावेळी तिथे तीन इसम मांस कापताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून त्या तिघांनाही जागीच पकडले.
घटनास्थळाची पाहणी केली असता, तीन प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये दोन गोवंशीय जनावरांचे अवयव आणि मांसाचे तुकडे भरलेले आढळले, तसेच काही मांस जमिनीवर प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवलेले होते. बाजूलाच कत्तलीसाठी वापरलेले ५ लहान-मोठे सुरे आणि कानस सापडली. याशिवाय, दक्षिण बाजूला एका झाडाला एक तांबड्या व पांढऱ्या रंगाची गोवंशीय गाय बांधलेली दिसून आली. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी महेश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत मांसाची पाहणी केली आणि तपासणीसाठी मांसाचे नमुने (सॅम्पल) घेऊन ते पंचांसमक्ष सीलबंद केले. या कारवाईत पोलिसांनी २०,००० रुपये किमतीचे दोन गोवंशीय जनावरांचे मांस व अवयव, ५०० रुपये किमतीचे पाच सुरे, प्रत्येकी ५० रुपये किमतीच्या २२ आणि १६ फूट लांबीच्या दोन नायलॉन दोऱ्या आणि १०,००० रुपये किमतीची एक जिवंत गाय, असा एकूण ३०,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५, ३(५), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा अधिनियम २०१५) चे कलम ५, ९ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ अन्वये नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. राजहंस नागदिवे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Comments
Post a Comment