बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून व्यापाऱ्यांना फसवणारा सातारा पोलिसांच्या जाळ्यात!
तब्बल १२ गुन्हे उघड, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
आरोपीला २४ तासांत पुणे जिल्ह्यातून अटक
सातारा, दि. ८ (प्रतिनिधी) :- बनावट बँक एनईएफटी (NEFT) स्क्रीनशॉट दाखवून सातारा शहरातील एका व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या अट्टल आरोपीला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध (D.B.) पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईमुळे आरोपीकडून तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून एकूण २३ लाख ४५ हजार २९० रुपये किमतीचे सोने, महागडे मोबाईल फोन, टीव्ही आणि एसी असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आदित्य विनोद गायकवाड (वय २२ वर्षे, रा. विजयराज हॉटेलजवळ, कोंढापुरी, शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २७ जून २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सातारा शहरातील पोवई नाका येथील 'एस.एस. मोबाईल शॉप' मधून एका अनोळखी इसमाने १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा 'फोल्ड ७' हा मोबाईल खरेदी केला. पैसे दिल्याचे भासवत त्याने बँक ऑनलाईन पेमेंटचा बनावट एनईएफटी स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवला आणि मोबाईल घेऊन पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी दुकानदाराने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे शोध (डी.बी.) पथकाला तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर डी.बी. पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा माग काढला. अत्यंत वेगवान हालचाली करत पोलिसांनी आरोपी आदित्य गायकवाड याला पुणे जिल्ह्यातील कोंढापुरी (शिक्रापूर, ता. शिरूर) येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग फोल्ड ७ मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने यापूर्वी शाहूपुरी (सातारा), कासेगाव (सांगली), तळेगाव एमआयडीसी (पुणे), हिंजवडी (पुणे), खोपोली (रायगड), आळेफाटा (पुणे) आणि थेट गोवा राज्यातही अशाच प्रकारे बनावट बँक स्क्रीनशॉट दाखवून सोने व महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तू लांबवल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून सर्व गुन्ह्यांमधील सोने, मोबाईल हॅन्डसेट, टीव्ही, एसी आणि गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल असा एकूण २३ लाख ४५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. माहिती मिळताच वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी गुन्हेगारीकडे वळलेल्या या आरोपीला अवघ्या १२ तासांत गजाआड करून साताऱ्यातील डी.बी. पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
दरम्यान, अशा प्रकारे बनावट बँक एनईएफटी किंवा ऑनलाईन पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून जर इतर कोणत्या व्यावसायिकांची फसवणूक झाली असल्यास, त्यांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाणे (फोन नंबर: ०२१६२-२३०५८०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस अंमलदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम आणि सचिन आदमाने यांच्या पथकाने केली आहे.


Comments
Post a Comment