मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

कोलाडमध्ये रिव्हर राफ्टिंगचा थरार बेतला जिवावर!

बोट दगडावर आदळून मुंबईतील २६ वर्षीय पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू


रोहा-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आणि साहसी जलक्रीडा प्रकारांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोलाडमध्ये रिव्हर राफ्टिंगचा थरार एका पर्यटकाच्या जिवावर बेतल्याची अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. मुंबईहून राफ्टिंगचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एका २६ वर्षीय तरुणाचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. धगडवाडी गावाच्या हद्दीत कुंडलिका नदीच्या प्रवाहात पाण्यातील एका मोठ्या दगडावर बोट अत्यंत वेगाने आदळून उलटल्यामुळे हा भयंकर प्रसंग उद्भवला. या घटनेमुळे संपूर्ण रोहा तालुक्यात तसेच पर्यटन क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, साहसी खेळांच्या सुरक्षिततेचा आणि नियमांच्या कठोर अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, नाथ मनोज अमर (वय २६, रा. विक्रोळी, एल.बी.एस. मार्ग, उद्यान रूम क्र. ६, मुंबई) असे या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव आहे. नाथ अमर हे कोलाड येथे मित्रांसमवेत रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी आले होते. राफ्टिंग सुरू असताना त्यांची बोट पाण्याच्या वेगवान प्रवाहातून पुढे जात होती. याच दरम्यान, बोट थगडवाडी गावाच्या हद्दीत आली असता पाण्याचा वेग आणि प्रवाहातील अडथळ्यांचा अंदाज न आल्याने ती थेट पाण्यातील एका मोठ्या दगडावर जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती की क्षणातच बोट उलटली आणि बोटीतील पर्यटक पाण्यात फेकले गेले. यामध्ये नाथ अमर हे थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात पडले आणि नाका-तोंडात पाणी गेल्याने बुडू लागले.

​अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. तातडीने बचावकार्य करत नाथ अमर यांना पाण्याबाहेर काढण्यात आले आणि अत्यंत गंभीर अवस्थेत पुढील उपचारांसाठी रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या शरीराने साथ सोडली होती. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व आवश्यक तपासण्या केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली असून, या आकस्मिक बातमीने अमर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोलाड पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. बोटीचा राफ्टिंग गाईड गणपती बच्चनसिंग रावत (वय २८, सध्या रॉकविल रिसॉर्ट, धगडवाडी, ता. रोहा; मूळ रा. मंजाडी ठाणा रामजुला, जि. टिहरी गढवाल, उत्तराखंड) याने पोलिसांना या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. गाईडने दिलेल्या या माहितीच्या आधारे कोलाड पोलीस ठाण्यात सध्यातरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा इनक्वेस्ट पंचनामा पोलीस उपनिरीक्षक श्री. भोजकर यांनी पूर्ण केला असून, रोहा उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील सखोल तपास कोलाड पोलीस करत असून, राफ्टिंग दरम्यान सुरक्षेच्या सर्व नियमांचे आणि उपाययोजनांचे पालन झाले होते की नाही, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog