पाली जवळील दापोडे येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण!
अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
पाली-रायगड, दि. १४ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मौजे दापोडे आदिवासीवाडी येथून एका १३ वर्षे ६ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रखरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही दापोडे आदिवासीवाडी येथील राहणारी असून घटनेच्या दिवशी ती अचानक आपल्या घरातून कोठेतरी निघून गेली होती. ती घरात न दिसल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून आली नाही. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही, तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिला काहीतरी आमिष दाखवून किंवा फूस लावून तिच्या कायदेशीर पालकांच्या रखवालीतून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने पाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पाली पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेतली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस हवादार श्री. ढुमणे हे करीत असून, पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता मुलीचा कसून शोध घेतला जात आहे.

Comments
Post a Comment